दिघी-रोहा रेल्वेला ग्रिन सिग्नल

0
57

रेल्वे आणि दिघी बंदर यांच्यात करार 

अलिबाग । प्रतिनिधी । महाराष्ट्रातील आर्थिक विकासात मोलाचा वाटा उचलण्याची क्षमता असलेली कोकण किनारपट्टी आणि उर्वरित महाराष्ट्र यांना रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकर घेतला असून त्याअंतर्गत रायगड जिल्ह्यातील दिघी बंदरात रोह्याशी जोडणार्‍या मार्गांबाबत सामंजस्य करारावर शनिवारी स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.

रेल्वेच्या बहुतांश प्रकल्पांना पूर्णत्वास नेणार्‍या रेल विकास निगम लिमिटेड आणि दिघी बंदर लिमिटेड या उभयतांमध्ये हा सामंजस्य करार करण्यात आला.रेल विकास निगमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्नीहोत्री आणि दिघी पोर्ट लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय कलंत्री यांनी या रोहा-दिघी पोर्ट रेल्वे मार्ग जोडणीच्या करारावर स्वाक्षर्‍या केल्या.
यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, मध्य व पश्‍चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडीअर सुनीलकुमार सूद, राज्याचे परिवहन सचिव गौतम चटर्जी उपस्थित होते.
देशाच्या लाभलेल्या साडेसात हजार किलोमिटर किनारपट्टी 10 टक्के किनारपट्टी एकट्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती, शेतीमाल परदेशात पाठवण्यासाठी किंवा या मालासाठी लागणार्‍या आणि आयात होणार्‍या उपयुक्त वस्तू परदेशातून आणण्यासाठी कोकण किनारपट्टीवरील बंदरे महत्वाची आहेत. या बंदरांचा विकास करण्यासाठी दिघी बंदर लिमिटेड या खाजगी बंदरासह झालेला हा करार महत्वाचा आहे असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी स्पष्ट केले.
कोकण किनारपट्टीच्या भागातील बंदरे रेल्वे मार्गाने उर्वरित महाराष्ट्राशी जोडली गेल्यास आपोआपच महाराष्ट्र राज्य विकसित होईल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

रेल्वे क्षेत्रात 150 अब्ज रुपयांची गुंतवणूक आवश्यक असून एलआयसी आणि रेल्वे पायाभूत घटक हे याचे प्रमूख आर्थिक स्त्रोत आहेत. पुढे 8,050 कोटी रुपये संपूर्ण देश रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी आवश्यक असल्याची माहिती रेल्वेमंत्री प्रभू यांनी दिली. शिवाय वाहतुकीसाठी हे प्रभावी माध्यम ठरणार असल्याचेही ते म्हणाले.

दिघी बंदर ते रोहा मार्ग

* लांबी- 33.76 किमी. प्रकार – एकपदरी ब्रॉडगेज मार्ग
* स्थानके – चार
* पुल – 84 (11 मोठे, 63 लहान आणि 10 रेल्वे मार्गावरून जाणारे)
* बोगदे – पाच (एकूण लांबी – 4320 मीटर)
* सर्वात लांब बोगदा – 3120 मीटर
* प्रकल्पासाठी लागणारा निधी- 800 कोटी.

कोकण उर्वरित महाराष्ट्राबरोबर जोडला । 

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र यांना रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असून त्यामुळे कोकण उर्वरित महाराष्ट्राबरोबर जोडला जाणार आहे. या रेल्वे मार्ग जोडणीमुळे बंदर नसलेले औद्योगिक क्षेत्र कोकणशी जोडले जाणार आहेत. म्हणजेच हा रेल्वे मार्ग कोकणच्या विकासाचाही मार्ग बनणार आहे. त्यामुळे  किनारपट्टीच्या भागात नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील, असा विश्‍वास रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना आहे. रेल्वे क्षेत्रात 150 अब्ज रुपयांची गुंतवणूक आवश्यक असून एलआयसी आणि रेल्वे पायाभूत घटक हे याचे प्रमूख आर्थिक स्त्रोत आहेत. पुढे 8,050 कोटी रुपये संपूर्ण देश रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here