‘सागर’चा मृतदेह 42 तासांनंतर सापडला

0
57

शवविच्छेदनासाठी मृतदेहाची परवड; कर्जतकरांमध्ये संताप

कर्जत । वार्ताहर । कर्जत तालुक्यातील रजपे येथील 23 वर्षीय तरुण चिल्लार नदीमध्ये पोहायला गेला असता रविवारी दुपारी नदीच्या पाण्यात वाहून गेला होता. त्या सागर पिंगळेचा शोध तब्बल 42 तासानंतर लागला, मात्र त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्याच्या मृतदेहाची परवड झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. तब्बल 48 तासांनंतर त्याचा मृतदेह पिंगळे कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.
3 जुलै रोजी कर्जत शहरातील भिसेगाव येथे सध्या वास्तव्य असलेल्या तानाजी पिंगळे यांचा मुलगा सागर (23) आपल्या गावी टेंबरे ग्रामपंचायतमधील रजपे गावी गेला होता. मूळ गावी आल्यानंतर सागर गावातील जुन्या मित्रांसह गावाबाहेरून वाहणार्‍या चिल्लारनदीवर पोहण्यासाठी दुपारी दोन वाजता घरातून निघाला. त्यादिवशी पावसाची संततधार सुरू असल्याने चिल्लार नदीतील पाण्याची पातळी वाढली. त्याची कल्पना पोहण्यात मग्न असलेल्या सागर आणि त्याच्या मित्रांना आली नाही आणि त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर सागर वाहून गेला होता. तेव्हापासून ग्रामस्थांच्या मदतीने व तहसील कार्यालयाने याक इन्स्टिट्युटच्या पाणबुड्यांच्या सहाय्याने त्याचा शोध सुरु होता. सोमवारी सायंकाळी काळोख पडल्यानंतर शोध मोहीम थांबविण्यात आली होती. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता सागरचा शोध लागला. 42 तासानंतर सागरचा मृतदेह रजपे गावाची स्मशानभूमी असलेल्या ठिकाणी नदी पात्रात सापडला. तो पाण्यात वाहून गेला तेथून जेमतेम 600 मीटर अंतरावर सागर पिंगळेचा मृतदेह तरंगला होता. त्याच्या मृतदेहाला माशांनी काही ठिकाणी दंश केले होते. दहा वाजता सागरचा मृतदेह गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबिवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदन करण्यासाठी नेला. मात्र तेथे कोणतीही व्यवस्था नसल्याने पुढे असलेल्या कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात सागरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. सकाळी अकराच्या सुमारास कशेळे ग्रामीण रुग्नालयात वैद्यकीय अधिकारी आणि शवविच्छेदन करणारे कर्मचारी उपलब्ध नव्हते. त्यामुळे सागरचा मृतदेह पुढे कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. तेथे दुपारी पंचनामा आणि अन्य कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सागरचा मृतदेह पिंगळे कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. सागर नदीच्या पाण्यात वाहून गेल्यापासून झालेला कालावधी हा तब्बल 48 तासांचा होता. त्यामुळे सर्व लोकांनी शव विच्छेदनास झालेला वेळ यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here