नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गाची दुरुस्ती लवकर पूर्ण करा

0
45

मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सी.एन. गोयल यांचे आदेश

कर्जत । वार्ताहर । मे 2016 पासून बंद असलेली नेरळ माथेरान मिनीट्रेन पुन्हा नॅरोगेज रुळावर येण्याचे संकेत मिळत आहेत. शुक्रवारी (दि.23) मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सी एन गोयल यांनी नेरळ-माथेरान मार्ग, नेरळ लोको, अमनलॉज येथे सुरु असलेल्या ट्रॅकच्या दुरुस्तीच्या कामांची पाहणी केली. सर्व कामे अल्पावधीत पूर्ण करण्याच्या सूचना महाव्यवस्थापक यांनी दिल्याने मिनीट्रेन लवकरच रुळावर येण्याची शक्यता निर्माण झाली.
किरकोळ अपघातानंतर 9 मे 2016पासून नेरळ-माथेरान मिनीट्रेन आणि शटल सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर गेले सहा महिने रेल्वेने नॅरोगेज मार्गाकडे दुर्लक्ष केले होते. परंतु रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी मिनीट्रेन बंद झाल्यामुळे माथेरानमध्ये निर्माण झालेली आर्थिक कोंडी, तेथील पर्यटन व्यवसाय याविषयी पाठपुरावा कायम ठेवला होता. मागील आठवड्यात या भागाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी यापूर्वी लोकसभेत दिलेल्या उत्तराची आठवण करून दिली होती. त्यानंतर अनेक महिने बंद असलेले मिनीट्रेनच्या नॅरोगेज मार्गाच्या दुरुस्तीचे काम रेल्वेने सुरु केले होते. 22 डिसेंबर रोजी पहाटे मिनीट्रेनसाठी बनविण्यात आलेली दोन नवीन इंजिने नेरळ येथे पोहचली होती.त्यानंतर आज मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय महाव्यवस्थापक सी एन गोयल यांनी नेरळ येथे येऊन सर्व माहिती घेतली. त्यांच्यासोबत मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नेरळ स्टेशन परिसरात उभे असलेले मिनीट्रेनचे डब्बे कशासाठी उभे आहेत याची माहिती घेतली, त्यावेळी शटल सेवेसाठी लागणारे आठ डब्बे आणि नेरळ-माथेरान मिनीट्रेन सेवेच्या तीन फेर्‍यांसाठी आवश्यक 26 नवीन डब्बे नेरळ लोको मध्ये असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. दुसरीकडे माथेरान वरून शटलचे इंजिन दररोज नेरळ येथे आणावे लागते, ते माथेरानमध्ये ठेवण्यासाठी काय करावे लागेल याबद्दल माहिती अधिकारीवर्गाकडून महाव्यवस्थापक गोयल यांनी घेतली. त्यानंतर सर्व अधिकारी नेरळ लोको मध्ये पोहचले, तेथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गोयल यांनी एअर ब्रेक प्रणाली लावण्यात आलेले प्रवासी डब्बे, तसेच गतवर्षी नेरळ लोकोमध्ये दाखल झालेले इंजिनाची पाहणी केली.
वाफेवर चालणारे परंतु डिझेल मध्ये रूपांतरित करण्यात आलेल्या 1907 च्या एनडीएम 794 या इंजिनची देखील पाहणी गोयल यांनी केली. अधिकारी वर्गाला सूचना केल्यानंतर महाव्यवस्थापक सर्व अधिकारी वर्गासह घाट रस्त्याने अमन लॉज येथे पोहचले. रस्त्याने जात असताना त्यांनी वॉटर पाईप स्टेशन परिसरात रेल्वे कामगारांकडून सुरु असलेल्या नॅरोगेज मार्गाच्या दुरुस्ती कामाची पाहणी केली. पुढे अमनलॉज येथे गेल्यानंतर मे महिन्यात मिनीट्रेनला अपघात झालेल्या मार्गाची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here