पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रायगडात

0
81

अलिबाग । प्रतिनिधी । रोखे बाजाराला गुणवत्ता प्रदान करण्याच्या उद्देशाने काम करणार्‍या ‘नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट’ (छखडच्)  या संस्थेचे  उद्घाटन आज (शनिवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अत्यंत देखण्या अशा या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली हेदेखील उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान आणि अर्थमंत्री येणार असल्याने रायगडात प्रचंड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी खालापूर तालुक्यातील मोहोपाडा येथे येणार आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांना प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. त्यामुळे ज्या महत्वाच्या व्यक्ती, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांना ओळखपत्र पारीत करण्यात आले आहे. अशा व्यक्तींनाच कार्यक्रम असलेल्या परिसरात हमरस्त्यावर व गल्लीबोळात, सार्वजनिक जागेत प्रवेश करता येणार असल्याचे जिल्हाधिकारी शीतल उगले-तेली यांनी सांगितले आहे.
दरम्यान, रोखे बाजार राष्ट्रीय संस्था (नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ सिक्युरिटी मार्केट) ही एक सार्वजनिक विश्‍वस्त संस्था असून भारतीय रोखे बाजाराचे नियमन करण्यासाठी सिक्युरिटीज अ‍ॅन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने 2006 साली तिची स्थापना केली. रोखे बाजारातील सहभाग वाढविण्यासाठी व विविध पातळ्यांवर क्षमता उभारणी करुन रोखे बाजाराला गुणवत्ता प्रदान करण्याच्या उद्देशाने ही संस्था कार्य करते. एनआयएसएमच्या सहा शाखा आणि नॅशनल सेंटर फॉर फायनान्शिअल एज्युकेशन या संस्थेची रोखे बाजारातील व्यावसायिकांमध्ये समन्वय निर्माण करण्यात महत्वपूर्ण भूमिका असते.

काय आहे एन.आय.एस.एम

नोकरी मिळवून देण्यास सहाय्य करते सिक्युरिटीज अ‍ॅन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) पुरस्कृत संस्था
सेंटर ऑफ फायनान्शिअल लर्निंग, आयसीआयसीआय, कोटक बँक यासारख्या विविध संस्थांसोबत शैक्षणिक भागीदारी आहे.
स्वतंत्र आर्थिक लॅब ब्लूमबर्ग, मॅटलॅब, एसएएस यासारख्या डेटाबेस आणि सॉफ्टवेअरमध्ये प्रवेश मिळवून देते.
आयएएडी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शिअल मॅनेजमेंट, इंटरनॅशनल क्रेन फाऊंडेशन इन्क यासारख्या संस्थाबरोबर करार.
भारतीय रोखे बाजारातील विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या व्यावसायिकांना प्रमाणपत्र उपलब्ध करुन देणारे हे एक माध्यम आहे.

उडण्यावर नियंत्रण

रायगड जिल्ह्याचे पोलीस कार्यक्षेत्रामध्ये खाजगी हेलिकॉप्टर उतरविणे व उड्डाण करणे, मायक्रोलाईट, एअरक्राप्ट, हँग ग्लायडर, ड्रोण, पॅराग्लॅडींग, बलून, पॅराशुट, हवेत उडणार्‍या व रिमोटद्वारा संचलित होणार्‍या वस्तू व खेळणी इत्यादींचे उड्डाण करण्यास बंदी आहे.

जेटली यांची उपस्थिती

मोहपाडा येथे होणार्‍या या कार्यक्रमाला केंद्रीय वित्त  मंत्री अरुण जेटली हेदेखील उपस्थित राहणार आहेत. शनिवारी 24 डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता नॅशनल इंस्टिट्यूट सेक्युरिटी मार्केट (छखडच्) येथे त्यांचे आगमन होणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here