कर्जतच्या पोलिसांना हक्काचे घर देणार

0
33

गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे आश्‍वासन

पोलीस वसाहतीची पाहणी

कर्जत । वार्ताहर । ‘कर्जत शहरात असलेल्या पोलीस वसाहतींपैकी ज्या वसाहती दुरुस्त करता येतील त्या दुरुस्त केल्या जातील, मात्र पोलीस कर्मचार्‍यांना मालकीची घरे देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार, असे आश्‍वासन राज्याचे अर्थ तथा गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. बुधवारी (दि.21) पोलीस निवासी वसाहतींच्या पाहणीनंतर ते बोलत होते.

कर्जत पोलीस ठाण्यात सुमारे 55 पोलीस कर्मचारी आहेत. या पोलीस कर्मचार्‍यांसाठी पाच वसाहती आहेत. त्यापैकी दोन वसाहती या कर्जतच्या टेकडीवर असून त्या सध्या वापरत नाहीत. तीन वसाहती या कर्जत पोलीस ठाण्याच्या आजूबाजूला आहेत. त्यापैकी दोन वसाहती या ब्रिटीशकालीन आहेत. पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेली वसाहत 1871 साली बांधण्यात आली आहे. त्या वसाहतीमध्ये 8 खोल्या आहेत. तर पोस्ट ऑफिसजवळ असलेली पोलीस वसाहत ही 1887 साली बांधण्यात आली आहे, त्याठिकाणी 6 खोल्या असून त्यापैकी 3 खोल्या वापरात आहेत. या वसाहतीमध्ये तीन खोल्यांमध्ये कर्मचारी राहतात. मात्र वसाहतीच्या बाजूला महाकाय वृक्ष वाढला आहे. त्याच्या मोठमोठाल्या फांद्या वसाहतीवर आल्या आहेत, त्या वादळी वार्‍यात कधीही वसाहतीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या वसाहती आहेत, मात्र त्या अनेक सोयींनी वंचित आहेत.
तिसरी वसाहत ही उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाच्या मागे आहे, या इमारतीचे काम 1984 साली करण्यात आले आहे. या इमारतीमध्ये 13 खोल्या आहेत. मात्र या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे आहे की त्या इमारतीची अवस्था दयनीय आहे. कसेतरी करून 5 कर्मचारी या इमारतीमध्ये राहत आहेत. त्याठिकाणी कसली सोय नसल्याने पोलीस कर्मचार्‍याला भाड्याचे खोली घेऊन रहावे लागत आहे. वसाहतीच्या दूरवस्थेमुळे पोलीस कर्मचार्‍यांचे हाल होत आहे. कर्जत येथे खाजगी कार्यक्रमासाठी आलेल्या गृहराज्य मंत्री दिपक केसरकर यांना शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक नितीन सावंत यांनी पोलीस वसाहतीची माहिती दिली.
गृह राज्यमंत्री केसकर यांनी पोलीस वसाहतीची पाहणी केली. यावेळी रायगडचे पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नागकुल, कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षक सुजाता तानवडे, नगरसेवक नितिन सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख संभाजी जगताप, माजी उपसभापती मनोहर थोरवे, आणि शिवसेनेचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते. गृहराज्य मंत्री केसरकर यांनी पोलीस वसाहतीमधील खोल्यांची पाहणी केली व राहत असलेल्या कर्मचार्‍यांशी संवाद साधून त्याचे प्रश्न समजून घेतले. या तीनही वसाहतीचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना त्यांनी पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here