वर्षासहलीसाठी बेस्ट माथेरान डेस्टिनेशन

0
157

जुलै महिन्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावून धुमाकूळ घातल्यावर नेहमीप्रमाणे कुठेतरी एखाद्या रमणीय स्थळांवर जाऊन तिथल्या नैसर्गिक धबधब्याखाली चिंब भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी अनेकजण जवळच असलेल्या पर्यटनस्थळास अधिक पसंदी देत असतात. सर्वांनाच जवळचे असलेले मुंबई-पुण्याच्या अगदी कवेत वसलेले हिरव्या गर्द वनराईने नटलेले रायगड जिल्ह्यातील अग्रगण्य ठिकाण म्हणजे अर्थातच माथेरान होय.

दरवर्षी येथे वर्षाऋतूमध्ये विशेषतः शनिवार आणि रविवारी पर्यटकांची जत्रा भरलेली पहावयास मिळते. माथेरानमध्ये जरी धबधबे नसले तरीसुद्धा घाटरस्त्यातून पायी ट्रेकींग करीत येताना वॉटर पाईप स्थानकाजवळच दोनशे फुटांवरून फेसाळणार्‍या धबधब्याखाली मनसोक्तपणे भिजण्याचा आनंद युवा वर्ग घेताना नेहमीच दिसतात. पावसाळ्यात पायी प्रवास करणार्‍या पर्यटकांमुळे घाटरस्तासुद्धा बोलका होतो. नेरळपासूनच पायी येताना निधड्या छातीने आणि अभिमानाने आपल्या अंगाखांद्यावर बागडण्यासाठी हा उभा डोंगर सर्वांनाच आमंत्रित करीत असतो. हिरव्यागार वनराईने नटलेला अन् शुभ्र दुधाळ पाण्याचे तुषार ओसंडून आपल्या माथ्यावरून खाली फेकणारा या डोंगराने हिरवा शालू पांघरूण ताजेतवाना झालेला दिसत असतो. माथेरान वरील उत्कट प्रेमापोटी इथल्या अद्भुत निसर्गाशी एकरूप होण्यासाठी निसर्गाच्या अविरत देणगी लाभलेल्या या स्थळावरील अवर्णनीय देखावे न्याहाळण्यासाठी हे एकमेव डेस्टिनेशन ठिकाण आहे.चोहोबाजूला नेत्रदीपक डोंगरदर्‍यांंच्या खाईत पॉईंटस् वरून डोकावून पाहताना अंगावर रोमांच आल्याशिवाय रहात नाही. हे नजारे एक नैसर्गिक वरदहस्त रूपाने लाभलेले आहेत. घोड्यावरून तसेच हातरिक्षामधुन पॉईंटस्ची सैर करण्याचा एक वेगळाच आनंद देऊन मनाला सुखावून नेत असते. अनेक पॉईंट्सवर भ्रमंतीस गेल्यावर आकाशातील दाट धुके जणूकाही भूमातेला आलिंगन देण्यासाठी उतरल्याचा भास झाल्याशिवाय रहात नाही. पॉईंटस् समोरून दुसर्‍या डोंगरावरील फेसाळणार्‍या जलप्रपातांना डोळ्यांत साठवून एकटक पहावेसे वाटते तर अनेक ठिकाणी निर्झरांंनी वाटा मोकळ्या केल्यामुळे दुग्धगंगाच बरसते की काय असेही मनोमनी कल्पना दाटते.
येथील शार्लोट तलावाच्या पूर्वेकडील बाजुस तलावाचे ओसंडून वाहणार्‍या पाण्याखाली अनेकजण मनसोक्त पणे आपल्या बाळगोपाळांसह चिंब भिजण्याची मजा लूटताना दिसतात. अंगाला अधिक गारवा जाणवल्यास मक्याची भाजलेली कणसे आणि एखाद्या स्टॉल्स्वर चहा आणि गरमागरम वडे, भजीचा आस्वाद घेण्याची मजासुद्धा काही औरच असते. इथे येण्यासाठी नेरळ मार्गे टॅक्सी सेवा चोवीस तास उपलब्ध असते. इथे आलेले पर्यटक हे वन्स मोअर म्हणतच माघारी परतताना दिसतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here