इतिहासाची आठवण करून देणारा कोथळीगड

0
125

कोथळीगड हा कर्जतपासून ईशान्येला साधारण 21 किमी अंतरावर असलेला किल्ला आहे. राजमाची आणि ढाक किल्ल्रयांच्या आणि सिध्दगड, भीमाशंकरच्या अलीकडे दाट झाडीतून हा किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे.

या किल्लयाला पायथ्याच्या ‘पेठ’ या गावामुळे याला ‘पेठचा किल्ला’ असेही संबोधले जाते. काही ठिकाणी याचा उल्लेख कोथळा असाही आढळतो. लहानशा दिसणार्‍या या किल्लयाचा इतिहास मोठा रक्तरंजित आहे. त्याविषयाची माहिती मराठी व इंग्रजी कागदपत्रातून नव्हे तर मुघली कागदपत्रांमधून मिळते. हा किल्ला काही बलाढ्य दुर्ग नाही, पण एक संरक्षक ठाणं होता. मराठ्यांचे या किल्लयावर शस्त्रागार होते. संभाजीमहाराजांच्या काळात त्याला विशेष महत्त्वही प्राप्त झाले होते. पायथ्या जवळच्या पेठ गावातून चहुबाजूंनी तासल्या सारखा पेठचा सुळका दिसतो. पायवाटेने वर पोहोचल्यावर पायर्यांचे व प्रवेशव्दाराचे अवशेष दिसतात. पुढे कातळाच्या पोटात खोदलेल्या गुहा दिसतात. प्रथम आहे ती देवीची गुहा, पाण्याचं टाके आणि मग डावीकडे ऐसपैस अशी भैरोबाची गुहा. या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे सपाट, समतल भूमी आणि छताला आधार देणारे कोरीव नक्षीदार खांब. गुहेत 45 ठिकाणी गोल खळगे आहेत आणि काही जूने तोफेचे गोळे आहेत.
गुहेजवळच एका ऊर्ध्वमुखी भुयारात किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायर्या कोरलेल्या आहेत.पायर्यांच्या मार्गावर उजवीकडे गज शिल्प कोरलेले आहे. पायर्यांच्या शेवटी दगडात कोरून काढलेला दरवाजा आहे. त्यावर शरभ शिल्प आहे. गडमाथ्यावर पाण्याची दोन टाकी आहेत. गडमाथ्यावरुन भीमाशंकरकडील कलावंतिणीचा महाल, नागफणी, वाघाचा डोळा, सिद्धगड, कल्याणकडील हाजीमलंग, चंदेरी, प्रबळगड, इर्शाळगड, माणिकगड, माथेरानचे पठार हा विस्तृत मुलूख नजरेच्या टप्प्यात येतो.गडमाथ्यावरुन परत गुहेजवळ येउन सुळक्याला प्रदक्षिणा घातलताना वाटेत पाण्याच्या टाक्यांचे दोन समुह व एक लेण पाहायला मिळते. याशिवाय गडावर प्रवेशव्दाराच्या उजवीकडे खाली उतरल्यावर तसे गावात मारुती मंदिरा जवळ तोफ पाहायला मिळते.
कसे जाल
* कर्जतहून एस्टी ने कशेळे मार्गे आंबिवली या गावात जावे. हे अंतर साधारण 30 किमी आहे.
* नेरळहून येताना कशेळे या गावी यावे आणि जामरुखची एस्टी पकडून आंबिवली गावात यावे.
आंबिवली गावातून गडाकडे जाण्यास रुळलेली वाट आहे. गडाच्या पायथ्याशी ‘पेठ‘ हे गाव आहे या गावाहून वर गडावर चढण्याचा मार्ग दमछाक करणारा आहे. पण वाटेवरील करवंदांची आणि चाफ्याची झाडे ही वाटचाल सुखावह करतात. ही वाट सरळ किल्लयाच्या प्रवेशव्दाराशी घेऊन जाते.
राहण्याची सोय-भैरोबाच्या गुहेत 20-25जण व्यवस्थित राहू शकतात. त्याशिवाय खाली पायथ्याशी पेठ गावात शाळेत अथवा मंदिरात व्यवस्था आहे. जेवणाची सोय- पेठ गावात ‘कोथळागड’ नावाचे हॉटेल आहे, घरगुती होऊ शकते. पाण्याची सोय-गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे, जाण्यासाठी लागणारा वेळ-आंबिवली गावापासून पेठ गावापर्यंत 2 तास आणि पेठ गावापासून गडावर पोहचायला 1 तास लागतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here