गोगावलेंच्या इशार्‍याचे घोसाळकरांना टेंशन

0
45

जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

अलिबाग | प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी शिवसेना आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्याविरोधात थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेच तक्रार करीत संरक्षणाची मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
शुक्रवारी (दि.२२) घोसाळकर यांनी अलिबाग येथे पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. गोगावले पिता-पुत्रांची पार्श्‍वभूमी पाहता त्यांनी दिलेली धमकी मी गंभीरपणे घेतली आहे. म्हणून संरक्षणाची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.  माणगाव येथील पॉस्को कंपनीतील ठेक्यावरुन हा वाद सुरु आहे. त्याला स्थानिक कामगारांची जोड देऊन घोसाळकर यांनी नुकतेच एक आंदोलन केले होते. मात्र यावेळी त्यांनी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले व त्यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यावर टिका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना विकास गोगावले यांनी प्रमोद घोसाळकर यांनी खोटे आरोप करु नयेत, अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा दिला होता.
या इशार्‍यानंतर घोसाळकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अनिल पारसकर यांच्याकडे धाव घेत आपल्याला संरक्षण देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष निगडे, जिल्हा संघटक ॠषिकांत भगत, आशिष भट, युवक अध्यक्ष जगदीश घरत, प्रविण रनवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here