अलिबाग-रेवदंडा रस्त्यासाठी शिवसेनेचा निर्वाणीचा इशारा

0
50

अलिबाग | वार्ताहर | अलिबाग-रेवदंडा या मुख्य रस्त्याची दुरुस्ती ५ ऑक्टोबरपर्यंत झाली नाही तर ६ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात बसून अनोखे आंदोलन करण्याचा निर्वाणीचा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन बुधवारी (दि.२७) निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांना देण्यात आले.
यावेळी राजिपचे विरोधी पक्षनेते व शिवसेना सहसंपर्कप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, निलेश म्हात्रे, विकास पिंपळे, संदीप पालकर व शिवसैनिक उपस्थित होते.
अलिबाग तालुक्यातील रस्त्याबाबतचे दुर्भाग्य अजूनही संपले नसून आजही अलिबाग- रेवदंडा, अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवस रस्ता खड्डेमयच राहिलेला आहे. अलिबाग-रेवदंडा या रस्त्यावर प्रवाशांना वाहतूक करताना रस्ता शोधावा लागतो. या खड्डेमय रस्त्यामुळे अनेकांना पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी यासारखे आजार झाले आहेत. तर या रस्त्याने अनेक अपघात होऊन प्रवासी जखमी झाले आहेत. वाहनांची अवस्थाही वाईट झाली आहे. तालुक्यातील खड्डेमय रस्त्यामुळे पर्यटकांनीही पाठ फिरवली असून याचा परिणाम स्थानिकांच्या रोजगारावर पडला आहे. गेल्या ३ वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना शिवसेनेने, सामाजिक संस्थांनी, नागरिकांनी, राजकीय पक्षांनी निवेदने दिली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र लोकांच्या गरजेकडे कानाडोळा करीतच आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निवेदन दिल्यानंतर १५ दिवसांत, १ महिन्यांत रस्त्याचे खड्डे भरले जातील अशी आश्वासन आतापर्यंत देण्यात आली. मात्र ही आश्वासने आता नेहमीचीच झालेली आहेत. यासाठीच शिवसेनेमार्फत जिल्हाधिकारी यांना निर्वाणीचा इशारा निवेदनामार्फत देण्यात आला आहे.
यामध्ये ५ ऑक्टोबरपर्यंत रस्त्यात पडलेले खड्डे भरले गेले नाहीत तर ६ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या दालनाबाहेर शिवसैनिक व नागरिक बसून आपले अनोखे आंदोलन करणार आहेत. तर ७ ऑक्टोबर रोजी बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहेत व ८ ऑक्टोबरला रस्त्यावर उतरून रास्ता रोको करणार असल्याचे सुरेंद्र म्हात्रे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here