फडणवीसजी, तुम्ही खोटारडे आहात!

0
132

तटकरेंच्या गुणगौरव सोहळ्याला जाण्याआधी रायगडकरांची माफी मागा..

| रायगड टाइम्स |
तुम्हाला ७० हजार कोटींचा जलसिंचन घोटाळा आठवतोय का? आठवतोय यासाठी, कारण आरोप करणारे सर्व आता तोंडात गुळण्या घेऊन बसले आहेत. शेकाप नेते आ. जयंत पाटील, किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस हे तिघे यामध्ये आघाडीवर होते. काळ्या, पांढर्‍या श्‍वेतपत्रिका निघत होत्या. माजी मंत्री आणि रायगडचे सुपूत्र सुनिल तटकरे यांना नकोसे करुन सोडले होते. तटकरे प्रामाणिक आहेत की नाही, त्यांनी गैरव्यवहार केले की नाही केले हा फक्त आता तपासाचा भाग राहिला आहे. आरोपकर्त्यांनी तटकरेंना कधीच क्लीनचिट देऊन टाकली आहे. मुख्यमंत्री फडणवीस राहिले होते. सोमवारी तेही तटकरेंवरील ‘समग्र’ या पुस्तक प्रकाशनाला उपस्थित राहून त्यावर शिक्कामोर्तब करणार आहेत. खरं तर या तिघांनी मिळून तटकरेंची नाही रायगडकरांची वाट लावून टाकली आहे. तटकरेंचे वाढते प्रस्थ रोखण्यासाठी त्यांचा राजकीय बळी देण्यात आल्याचे त्यांच्या वर्तनातून दाखवून दिले आहे. यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी रायगडकरांची माफी मागायला हवी.

रायगडकरांसाठी ते दिवस त्यातल्या त्यात बरे…जेव्हा सुनिल तटकरे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पटकन लक्षात येईल असे मोठे काम नाही आठवत पण; जिल्ह्यात छोटी छोटी कामे सुरु होती. दर आठवड्यात पालकमंत्री मतदारसंघात फिरते असायचे. त्यामुळे प्रशासनही सजग असायचे. प्रशासनावर पकड आणि अधिकार्‍यांमध्ये असलेला त्यांचा दरारा सहज लक्षात येत असे. जिल्हा नियोजन अथवा अन्य सर्व सभा नियमित होत होत्या. शेकाप नेते आ.जयंत पाटील यांनी तर तटकरे यांची आठवडामंत्री अशा शब्दांत हेटाळणी केली होती. अर्थमंत्री असताना तटकरे यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये रायगडमधील अनेक विकासकामांचा समावेश केला होता. त्यावेळी तटकरे यांनी सादर केलेले बजेट हे रायगड जिल्हा परिषदेचे बजेट असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. खरे तर रायगडकरांसाठी हे काम अभिमानास्पद होते.

एकेकाळी बॅ. ए.आर. अंतुलेे यांचा हात पकडून राजकारणाचे धडे गिरवणारे सुनिल तटकरे रायगडचे हेडमास्टर होऊन बसले. कॉंग्रेस, शेकापच्या तुलनेत नवखा असलेल्या राष्ट्रवादीसारखा पक्ष जिल्ह्यात नंबर एकवर नेऊन ठेवला. यादरम्यान त्यांचे शेकापशी अनेक राजकीय वाद झाले. मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला. त्यानंतरही तटकरे यांनी दहा-बारा वर्षे रायगडचे पालकमंत्रीपद भूषवले. एक गोष्ट जाणवत होती. अलिबागला महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले तटकरे अलिबागच्या प्रेमात होते. जिल्ह्यातील इतर तालुक्यांसारखाच त्यांना आता अलिबाग तालुक्यातही पक्ष वाढवायचा होता. त्यांनी लक्ष टाकायला सुरुवात केली. पक्ष वाढायलाही लागला मात्र दुसरीकडे अलिबागवर पकड असलेला शेकाप फुटू लागला. त्यामुळे शेकाप नेते आ. जयंत पाटील यांची झोप उडायला लागली आणि सुरु झाला दोन नेत्यांमध्ये टोकाचा संघर्ष.

शेकाप नेते जयंत पाटील हे राजकारणी असले तरी ते अत्यंत मोठे व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे पैसा आणि सत्ता बरोबरीने आहेत. कार्यकर्त्यांचीही मोठी फौज त्यांच्या हाताशी आहे. असे असताना तटकरे या तिन्ही आघाड्यांवर जयंत पाटील यांना पुरे पडत होते. त्यामुळे, या तटकरेंचा व्यवसाय काय? कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा? असा प्रश्‍न सुरुवातील ते जाहीर सभांमध्ये विचारत असत. तटकरेंवर शक्य ती सर्व आदळाआपट करीत असतानाच, तटकरे यांच्या शंभर पैक्षा जास्त कंपन्या त्यांच्या हाती आल्या. जयंत पाटील यांच्यासाठी ही संजीवनी होती. त्यानंतर जयंत पाटलांचा वेगळे रुप रायगडकरांनी पाहिले. काळी श्‍वेतपत्रिका काढण्यात आली. अगदी केजरीवाल यांना रोह्यात आणून मोजता येणार नाहीत येवढे आरोप त्यांनी तटकरेंवर केले. भापजचे खासदार किरीट सोमया सोबत होते. पुढे हे प्रकरण सोमय्यांनी कोणाकडे नेेऊन सोपवले की त्याचा शोध घेण्यासाठी आता एसआयटी नेमावी लागेल अशी गत आहे.

शेकाप नेते आ. जयंत पाटील आणि तटकरे यांचे आता गळ्यात गळे आहेत. सोमय्या त्यांची पत्रकार परिषद असली की मेसेज करतात, आमचे पत्रकार त्यावर ‘तटकरेंचे काय झाले?’ हा एवढा मेसेज रिप्लाय म्हणून पाठवतात. अनेक दिवाळ्या आल्या नि् गेल्या. तटकरे आहेत तिथेच आहेत. मध्येच कधी तरी एखादी बातमी येते. तटकरेंना अटक होणार? वातावरण गरम होते. थोडी चर्चा होते. पुन्हा सर्व शांत… आता तीन वर्षे उलटून गेली आहेत. लोकांनाही आता खात्री झाली आहे, फडणवीस असोत नाहीतर एकोणीस, वीस, एकवीस, सर्वच ‘साले’ चोर आहेत. तटकरेंना अटक होईल का? हा प्रश्‍न आता विचारणेही बंद झाले आहे. त्याऐवजी दोन शिव्या, हासडतात आणि शांत होतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी बाकावर होते तेव्हा, तटकरे आणि अजित पवार यांच्याविरोधातील बैलगाडी भरुन पुरावे सादर केले होते. कोंढाणे धरणातील कथित गैरव्यवहाराबाबत फडणवीसांनी तटकरेंना सळो कि पळो करुन सोडले होते. काय म्हणाले होते हे त्यांच्याच शब्दांत वाचा, ‘‘चितळे समितीचा अहवाल आघाडी सरकारने चार महिने दडवून का ठेवला? अहवाल मांडताना केवळ कृती अहवाल मांडला. चितळेंच्या अहवालातून काही अंश घेवून ती समरी का मांडलीत? खरं म्हणजे सभागृहात पुरावे मांडण्यापासून न्यायालयात जाण्यापर्यंत सर्व ते केले. १४ हजार पानांचे पुरावे मी आणि तावडे यांनी त्यांना नेवून दिले. २२ वेळा हा विषय आम्ही सभागृहात मांडला. हा अहवाल जर आम्ही फोडला नसता तर हे सत्यच बाहेर आले नसते. याप्रकरणी अजित पवार आणि सुनिल तटकरे दोघेही जबाबदार आहेत’’ हे त्यांचे वाक्य आहे.

महोदय, आता तुम्हाला कोणी अडवलंय. तीन वर्षांचा काळ उलटला. बैलगाडी भरुन ठेवलेले पुरावे आता हवेत विरले आहेत. आज सोमवारी (९ ऑक्टो.) तेच फडणवीस सुनिल तटकरे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन अर्थात ‘तटकरेंची गौरवगाथा’ गाणार आहेत. निमंत्रण असेल तर त्यांनी जायलाही हवं मात्र त्या आधी त्यांनी सर्वप्रथम रायगडकर जनतेची जाहिर माफी मागितली पाहिजे. खुप ऐकलं, सहनही केलं. बदनामी एकट्या तटकरेंची नाही तर रायगडच्या जनतेलाही सहन करावी लागली आहे. फडणवीस बोलतात म्हणजे खरेच असणार, यावर विश्‍वास ठेवला, पण तुमचे आरोप हे खोटे होते. फडणवीस तुम्ही खोटारडे आहात!

– राजन वेलकर, अलिबाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here