उशीरा येणार्‍यांचे फुल देऊन स्वागत

0
105

पनवेल महापालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची युक्ती

। रायगड टाइम्स ।
पनवेल । बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी लावण्यात येत असल्यामुळे कर्मचारी वेळेत येतात, मात्र हजेरी लावून पुन्हा हे कर्मचारी कामचुकारपणा करीत बाहेर जाण्याचा प्रकार घडत होता. या उशीरा येणार्‍या कामचुकार कर्मचार्‍यांना अद्दल घडविण्यासाठी पनवेल महापालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी मंगळवारी (दि.20) गांधीगिरीचा मार्ग अवलंबला. कार्यालयात येण्याची वेळ होऊन गेल्यानंतर महापालिकेत येणार्‍या कर्मचार्‍यांचे त्यांनी झेंडूचे फुल देऊन स्वागत केले. तब्बल 36 कर्मचारी उशीरा आल्याचे निदर्शनास आले.
पनवेल महापालिकेत काम जास्त आणि कर्मचारी संख्या कमी अशी अवस्था आहे. स्वच्छता सर्वेक्षणाच्या कार्यक्रमात अनेक अधिकारी, कर्मचारी गुंतल्यामुळे नागरिकांच्या सोयीसुविधांच्या कामावर परिणाम होतो आहे. कर्मचारी संख्या कमी असूनही कामचुकार कर्मचारी वेळेत कामावर येत नव्हते, तसेच बायोमेट्रिक हजेरी लावून पुन्हा बाहेर चहापानासाठी जाण्याचे प्रकार वाढले होते. अशा कर्मचार्‍यांना उशीरा आल्याबद्दल नोटीसा देण्यात आल्या. मात्र या कर्मचार्‍यांना अद्दल घडावी म्हणून उपायुक्त लेंगरेकर यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबिला.
सकाळी साडेदहा वाजता महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाहेर उभे राहून उशिरा प्रवेश करणार्‍यांचे झेंडूचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. उपायुक्त झेंडूचे फुल घेऊन दारात उभे आहेत, हे समजल्यानंतर उशिरा प्रवेश करणार्‍यांची धांदल उडाली. शरमेने मान खाली घालत अनेक कर्मचार्‍यांनी झेंडूचे फुलदेखील स्वीकारले. अर्ध्या तासात उशिरा आलेले तब्बल 36 कर्मचारी निदर्शनास आले. पूर्वी या संदर्भात कर्मचार्‍यांना नोटीस देऊनही सुधारणा न झाल्यामुळे हे झेंडूचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. यापुढे उशीर झाल्यास रजा कमी करण्यात येईल, अशी ताकीद उपायुक्त लेंगरेकर यांनी दिली.
उशीरा येणार्‍या कर्मचार्‍यांना गांधीगिरी करण्यासाठी गुलाबाची फुले न देता झेंडूची फुले देण्यात आली. गुलाबाऐवजी झेंडू का, असा प्रश्न वरिष्ठ अधिकार्‍यांना विचारला असता त्यांच्यासाठी महागडी फुले का खर्च करायची, असा सवाल त्यांनी हसत हसत उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here