महापौरांच्या कार्यालयात आरटीई मदत केंद्र

0
102

ऑनलाईन अर्ज, कागदपत्रांबाबत माहिती

दोन हजारांपेक्षा जास्त जागा

। रायगड टाइम्स ।
पनवेल । खासगी इंग्रजी, मराठी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांतील 25 टक्के आरक्षित जागांसाठी पनवेल तालुक्यात ऑनलाईन मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत रिक्त जागांसाठी 25 टक्के प्रवेशाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. दोन हजारांपेक्षा जास्त जागा आहेत. पालकांना याबाबत माहिती देण्याबरोबरच ऑनलाईन अर्ज भरून देण्याकरीता पनवेल येथील महापौर डॉ.कविता चौतमोल यांच्या संपर्क कार्यालयात मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.

मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे शैक्षणिक शुल्क मोठ्या प्रमाणात आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असलेले पालक आपल्या पाल्यांना अशा शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकत नव्हते. ही बाब शासनाच्या समोर आल्यानंतर शासनाने ‘आरटीई’अंतर्गत वंचित घटक (एससी, एसटी), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अपंगांसाठी अशा शाळांमध्ये मोफत प्रवेश देणे बंधनकारक केले आहे. 10 फेब्रुवारीपासून प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्यास सुरूवात झाली आहे.
28 फेब्रुवारी अंतिम तारीख आहे. अनेक पालकांना याबाबत माहिती नाही. त्याचबरोबर अर्ज भरण्याकरीता अनेक अडचणी येतात. त्यांची गैरसोय दूर व्हावी याकरिता महापौर डॉ.कविता चौतमोल यांनी नवीन पनवेल सेक्टर-4 येथील संपर्क कार्यालयात मदत केंद्र सुरू केले आहे. या ठिकाणी पालकांना इंत्यभूत माहिती दिली जात आहे. संबंधीतांना ऑनलाईन अर्ज भरून दिले जात आहेत. या व्यतिरिक्त कागदपत्र जमा करण्याकरीता मदतसुध्दा केली जात आहे.
महापौैर संपर्क कार्यालयाच्यावतीने रविवारी आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देण्याकरिता कार्यशाळा घेण्याचे नियोजन असल्याची माहिती किशोर चौतमोल यांनी दिली. यानिमित्ताने तज्ज्ञ तसेच शिक्षणाधिकारी कार्यालयातून अधिकार्‍यांना निमंत्रित करण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले

आवश्यक कागदपत्रे…

रहिवासी पुरावा, आधार कार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, टेलिफोन बिल, पाणीपट्टी पावती, वाहन चालविण्याचा परवाना यापैकी एक. जातीचे प्रमाणपत्र- तहसिलदार, उपविभागीय अधिकार्‍यांचे, अपंगत्व प्रमाणपत्र- जिल्हा शल्यचिकित्सक, शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र; कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला- तहसिलदार, नायब तहसिलदार दर्जाच्या अधिकार्‍यांकडील दाखला; जन्माचा दाखला- ग्रामपंचायत, मनपा यांचा दाखला; रुग्णालयातील नोंद, अंगणवाडी, बालवाडीतील रजिस्टर दाखला अथवा आई-वडिलांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन; बालकाचे पासपोर्ट साईजचे रंगीत छायाचित्र.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here