कर्जमध्ये कोरोनाचे 5 नवीन रुग्ण; नेरळ येथील खासगी डॉक्टरला लागण

0
1382

दवाखाना 15 दिवस बंद; तालुक्यात नेरळ वगळता सर्वत्र लॉकडाऊन

कर्जत : कर्जत तालुक्यात कोरोनाची संसर्ग वाढत चालला आहे. आज कोरोनाचे 5 नवीन रुग्ण आढळून आले असून तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 133 झाली आहे. यात नेरळ येथील एका खासगी डॉक्टरही कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांचा दवाखाना 15 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

कर्जत तालुक्यातील वंजारपाडा येथील 29 वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची तपासणी करणारे नेरळ साई मंदिर परिसरातील 45 वर्षीय डॉक्टर हे आज कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे नेरळ-कळंब रस्त्यावर साई मंदिर परिसरात असलेले या डॉक्टरांचे रुग्णालय पुढील 15 दिवस बंद राहणार आहे. काल कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाने या डॉक्टरांच्या रुग्णालयात तीन दिवस उपचार घेतले होते. त्यामुळे आरोग्य विभागाने या डॉक्टरांकडे आलेल्यांची यादी ताब्यात घेतली असून त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून लक्ष ठेवले जात आहे.

दुसरीकडे चिंचवली येथील केश कर्तनालय चालविणार्‍या तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. त्या सलून चालकाच्या संपर्कात आलेल्या चिंचवली गावातील एका 29 वर्षीय तरुणाचे कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर बोरवाडी येथील उत्तर कार्यमधील सहभागी पाली वसाहत येथील तरुणाच्या घरातील एका पाच वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे.

कर्जत शहरातील मुद्रे येथील आणखी तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात कर्जत शहरातील नेमिनाथ अपार्टमेंटमधील 25 वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाली आहे. हा तरुण ठाणे येथे नोकरी करण्यासाठी दररोज जात असून तो कोरोनाग्रस्त झाला आहे. तर मुद्रे भागातील स्वप्ननगरी भागातील आणखी दोन जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात 48 वर्षीय पुरुष आणि 45 वर्षीय स्त्री रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, कर्जत तालुक्यात आजच्या 5 नवीन रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 133 वर पोहचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here