खोपोलीतील वीज वितरणचा हलगर्जीपणा

5474 Viewed Raigad Times Team 0 respond

आ.सुरेश लाड आक्रमक,खोपोलीतील ग्राहकांच्या तक्रारीत वाढ,अधिकार्‍यांची भंबेरी

खोपोली । वार्ताहर । महावितरण खोपोली कार्यालयातील अनागोंदी कारभाराविरोधात आ. सुरेश लाड यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. लाड यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अधिकार्‍यांची चांगलीच भंबेरी उडाली होती. महावितरण खोपोली कार्यालयातील ग्राहकांच्या वाढत्या कार्यालयातील तक्रारीची दखल घेत आ. सुरेश लाड यांनी शनिवारी (दि.2) खालापूर शासकीय विश्रामगृहात पत्रकारांच्या उपस्थितीत अधिकार्‍यांबरोबर विशेष बैठक अयोजित केली होती. यावेळी आ. लाड चांगलेच आक्रमक झाले होते. त्यामुळे महावितरणच्या अधिकार्‍यांना उत्तरे देणेही कठीण झाल्याचे पहायला मिळाले.

खोपोली शहर व परिसरात वारंवार वीजप्रवाह खंडीत होणे भरमसाठ बिले, तसेच कार्यालयातील मनमानी कारभार याबाबत सातत्याने जनतेच्या तक्रारीत वाढ होत असलेली पाहुन तसेच उसळलेला जनक्षोभ लक्षात घेता आ. सुरेश लाड यांनी महावितरण कारभाराचे पोस्टमार्टमच केले.
यावेळी उपस्थित नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर यांनीही उपस्थित अधिकार्‍यांवर प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांना धारेवर धरले. आ. लाड यांनी काही अधिकार्‍यांना सूचना केल्या की दुरूस्तीकरणाचे काम सुस्थितीत होईपर्यंत सातत्याने वीजप्रवाह खंडीत न करता आठवड्यातून दोन दिवस ठरवा व त्या दिवशी काम करा. खोपोली टाऊन फिडरवर इतर भागाचा अतिरिक्त भार देवू नये, वीज खंडीत करण्यापूर्वी वॉट्सअ‍ॅप अथवा फोनद्वारे लोकप्रतिनिधी, पत्रकारांना मेसेज पाठवा, सणावाराला वीज प्रवाह खंडीत करू नये तसेच स्थानिक पातळीवर सहकार्य लागल्यास नगराध्यक्ष व लोकप्रतिनीधींचे सहकार्य घ्यावे असे आवाहन लाड यांनी केले.
वनविभागाबाबत कुठे अडत असेल तर, आमदार म्हणून मला माहिती द्या, तात्काळ आपल्याला सहकार्य केले जाईल. सध्याच्या वीजमीटर तक्रारीबाबत त्यांनी कार्यकारी अभियंता मुंडे यांना विचारले असता, मुंडे यांनी खोपोलीत मिटर तपासणीबाबत एक दिवसाचा कॅम्प लावणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी कार्यकर्ते व पत्रकारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्याबाबत अधिकार्‍यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी अधिकार्‍यांनी येत असलेल्या अडचणींचा उहापोह केला. त्यावर आ. लाड यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या वाढवून ग्राहकांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना अधिकार्‍यांना दिल्या.
या बैठकीला नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, उपनगराध्यक्ष रमेश जाधव, राष्ट्रवादी जिल्हा माहिला अध्यक्ष अश्विनी पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नरेश पाटील, खोपोली अध्यक्ष मनेष यादव आदीसह अनेक कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते. महावितरणतर्फे कार्यकारी अभियंता मुंडे, खोपोली सहाय्यक अभियंता नांदगावे, कनिष्ठ अभियंता पाटील, दिघे, पिल्ले व अधिकारी उपस्थित होते.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
4/5 - 1
You need login to vote.

साजगावचा विकास करण्याचे आव्हान

मुसळधार पाऊस, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

Related posts
Your comment?
Leave a Reply