समाजाला पर्यटन साक्षर करण्याची गरज

242 Viewed Raigad Times Team 0 respond

रायगडच्या पर्यटनाला दुर्घटनांची काळी किनार

रायगड जिल्ह्याला निसर्गाचा संपन्न असा वारसा असल्यामुळे जिल्ह्यात पर्यटकांचा ओघ वाढतो आहे. पावसाळा असो, हिवाळा असो, वा उन्हाळा असो, रायगड जिल्हा पर्यटकांनी बहरलेला असतो. जिल्ह्यात पर्यटन वाढतेय ही आनंदाची बाब आहे, परतु या आनंदाला पर्यटकांचा अतिउत्साह आणि जिल्हा प्रशासनाची पर्यटनविषयक अनास्था यामुळे अपघातांची काळी किनार लागत असल्याचे गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने दिसून येत आहे. या पंधरवड्यात पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी निसर्गाची अती सलगी केल्यामुळे एकट्या कर्जत तालुक्यात 11 जणांचे बळी गेले आहेत. इतर तालुक्यांमधूनही दुर्घटनांमध्ये पर्यटकांच्या मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. गेल्या पंधरा महिन्यात जिल्ह्यामध्ये 30 पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे ही जिल्हा प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे. काही ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालून हा प्रश्‍न सुटणार नाही. या दुर्घटना थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पर्यटकांच्या सुऱक्षिततेसाठी भक्कम पावले उचलली पाहिजेत, त्याबरोबरच जिल्हा प्रशासन आणि पर्यटनविषयक संस्था, तसेच विविध सामाजिक संस्था यांनी संयुक्तपणे समाजात पर्यटन साक्षरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
रायगड जिल्हा रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी विव्हळतोय, प्रवाशांची हाडं या खड्ड्यांमुळे खिळखिळी बनताहेत, या खड्ड्यांमुळे पर्यटकांना जिल्ह्यात पावसाळी पर्यटनासाठी काही मर्यादा पडत असल्या तरी येथील धबधबे, धरणे, तलाव, नद्या, समुद्र किनारे, डोंगरदर्‍या पर्यटकांसाठी आकर्षणकेंद्रे ठरत आहेत, त्यामुळे सगळ्या अडचणींवर मात करुन ते तिकडे धाव घेत आहेत. शनिवार, रविवारी तर अशा ठिकाणांना जत्रेचे स्वरुप येते. फरक इतकाच असतो की खर्‍या जत्रेत आकाशपाळणे, मेवामिठाईची दुकाने असतात, या पर्यटकांच्या जत्रेत ठाई ठाई निसर्गसौंदर्याची नवलाई असते. अशा निसर्गाचा मान राखत, मर्यादा राखत आस्वाद घेऊन, एक वेगळीच ऊर्जा रोमारोमात साठवून पर्यटक परतीची वाट चालतात. दुर्दैवाची बाब म्हणजे सर्वच पर्यटक या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी आलेले नसतात. निसर्गातून त्यांना ऊर्जा नको असते, तर दारुतून त्यांना ऊर्जा पाहिजे असते, त्यामुळे दारु पिऊन बेभान होऊन तेथे धिंगाणा घालतात, दारुच्या बाटल्या फोडून तेथेच टाकून तेथील परिसराचा अक्षरश: उकिरडा बनवतात, जणू काही ही माणसं नाही, तर डुकरं आहेत असे त्यांचे वर्तन असते. त्या वर्तनाचा त्रास बहुसंख्य पर्यटकांना होतो. फुटलेल्या दारूच्या बाटल्यांनी जखमी होण्याच्या घटना सर्रास घडतात. हे बेवडे येथील शेतांत, समुद्र किनारी दारुच्या बाटल्या फोडून टाकून जातात, त्याचा त्रास शेतकर्‍यांना, शेतमजुरांना, समुद्रकिनारी फिरायला येणार्‍यांना अतोनाच त्रास होतो. बेवड्या पर्यटकांमुळे पर्यटन बदनाम होते, त्यात अतीउत्साही पर्यटकांनीही पर्यटन बदनाम होत आहे. समुद्र, नद्या, धबधबे, डोंगरदर्‍या यांच्याशी उतावीळपणे दंगामस्ती करू नये, याचे भान राखले जात नसल्याने रायगड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात दुर्घटनांत पर्यटकांचे बळी जात आहेत. यातून पर्यटकांनीही धडा घेणे आवश्यक आहे, पण तसा तो घेतला जात नाही.
विविध वयोगटातील, स्तरातील पर्यटक पहायला मिळतात. काहीजण तर आपल्या पालकांना न सांगता पर्यटनासाठी येतात. महाविद्यालयीन, तसेच विविध कंपन्यांतील तरुण-तरुणी, समूहाने पावसाळी निसर्गाचा आनंद लुटाण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी येतात. तो परिसर त्यांना पूर्णपणे माहितीही नसतो. अशा परिस्थितीत तारुण्याच्या मस्तीत काही तरुण-तरुणी धोकादायक धबधब्याखाली स्नान करणे, नदीच्या-ओढ्याच्या प्रवाही पाण्यात उतरणे, समुद्राच्या पाण्यात खोलवर शिरणे, अशी दंगामस्ती करतात. गेल्या काही वर्षात वाहनांची मुबलकता झाल्यामुळे, पाच दहा जणांची टोळकी वाहनांतून पावसाळी सहलीचा आनंद लुटायसाठी येतात. भरधाव वेगाने वाहने चालवणे. डोंगरातल्या कड्याकपारीतून चालत जाणे, वाटा माहिती नसलेल्या जंगलात घुसणे, असे प्रकार नित्यनियमाने घडतात. पावसाळ्यात डोंगरवाटा निसरड्या झाल्यामुळे, पाय घसरून दरीत कोसळायचा धोका अधिक असतो. त्या परिसरातील लोकही अमक्या ठिकाणी जावू नका, ती वाट धरू नका, असे पर्यटकांना आवर्जून सांगतात. पण, त्यांचा सल्ला धुडकावून काही तरुण-तरुणी त्या बाजूला जातात आणि अपघातांचे बळी होतात. त्यामुळे या सर्वाचे खापर पूर्णपणे जिल्हा प्रशासनावर फोडणे योग्य होणार नाही, हेही खरे आहे.
पर्यटकांनी आपण पर्यटनासाठी आलो आहोत, निसर्गात रममाण होण्यासाठी आलो आहोत, धिंगाणा घालण्यासाठी नाही, मर्यादांचे उल्लंघन करण्यासाठी नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. पण धोक्याचा इशारा देणारेे फलक न वाचणे, वाचूनही धोक्याच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करणे, स्थानिक नागरिकांचा सल्ला धुडकावणे असे प्रकार पर्यटक करतात आणि त्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. समुद्रस्नानाचा आनंद लुटू पाहणार्‍या पर्यटकाचा बुडून मृत्यू अशा आशयाच्या बातम्या पूर्वीच्या तुलनेत अधिक वाचायला मिळतात. समुद्र तोच आहे, तेच समुद्र किनारे आहेत. त्यांच्या मर्यादा पर्यटक ओलांडतात आणि समुद्राला दोष दिला जातो. अनेक ठिकाणी पर्यटक पिऊन समुद्रात उतरतात, किंवा समुद्रस्नान करताना पिण्याचा आनंद लुटतात. मोठ्याप्रमाणात पर्यटक तरुण आणि तरुणी असा एन्जॉय करताना सगळीकडे पाहायला मिळतात. समुद्राच्या भरती-ओहटीचा अभ्यास न करता खोलवर समुद्रात घुसल्यामुळेही पर्यटकांना आपल्या जीवास मुकावे लागते. काही ठिकाणी लाइफगार्ड ठेवण्यात आले असले तरी अशा घटना घडतातच. पर्यटकांनी आपली बेपर्वा वृत्तीही सोडली तर बर्‍याच दुर्घटनांवर अंकुश बसेल यात वाद नाही. स्थानिकांनीही पर्यटक आपले वैरी असल्यासारखे त्यांच्याशी वर्तन करु नये आणि पर्यटकांनीही स्थानिकांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. रायगडच्या महसुलात पर्यटनामुळे भर पडत आहे, अनेक व्यवसाय त्यामुळे भरभराटीस आले असून बेरोजगारांना रोजगाराच्या संधीही प्राप्त झाल्या आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.
पर्यटन ही गोष्ट वाईट नाही, पर्यटन हे जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी, जीवनातील मरगळ घालवण्यास उपयोगी पडते. पर्यटनाचा उद्देशही तोच असावा, पण हा उद्देश विसरुन निसर्गाची छेडछाड केली जाते आणि येथूनच शोकांतिकेला सुरुवात होते. पर्यटन दारु पिण्यासाठी आणि धिंगाणा घालण्यासाठी असेल तर सुरक्षितता तरी कोण आणि कशी देईल? पर्यटकांनीही आपल्या सुरक्षेची काळजी घेतली तर ती त्यांच्याच हिताची आहे. मुळात रायगड जिल्ह्यात पर्यटनाकडे फार गांभीर्याने पाहिले जात नाही. पर्यटनाच्या माध्यमातून रायगडचा विकास करता येणे शक्य आहे. पण सरकारची रायगडच्या विकासाबाबतची माध्यमे वेगळी आहेत. त्यात पर्यटन बसत नाही. औद्योगिकरण हेच जिल्ह्याचे भले करेल, मग भले रासायनिक कारखानदारीने येथील समुद्र, नद्या-नाले नासवले तरी चालेल ही तिची भावना आहे. भाताचं कोठार म्हणून ओळखला जात असतानचा संपूर्ण रायगड जिल्हा कृषीपर्यटनाचं केंद्र होतं. आता मात्र औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या रायगडमध्ये कृषीपर्यटन असं असतं हे सांगावं लागत आहे. त्यासाठी अशी केंद्रे विकसित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील शेतीक्षेत्र प्रचंड प्रमाणात घटलं, उद्या तथाकथित विकासाच्या वाटेवर आजचा उरलासुरला निसर्गसंपन्न रायगड जिल्हा बेचिराख झाला, तर या जिल्ह्याच्या पर्यटनक्षेत्राचे काय होईल ही चिंताही मोठी आहे. रायगडच्या पर्यटनाला चिंतेचे वेगवेगळे कंगोरे आहेत. या कंगोर्‍यात आता गेल्या काही वर्षांपासून दुर्घटनांची वाढ झाली आहे. ही वाढ रोखण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावले उचलली पाहिजेत. त्यासाठी पर्यटन साक्षरतेची मोहीम पर्यटन संस्था, सामाजिक संस्थाच्या सहकार्याने राबविली पाहिजे. ही मोहीम राज्यपातळीवरही राज्यशासनाने राबवून पर्यटनविषयक जागृती घडविली पाहिजे. कारण पर्यटन निरक्षरतेचा प्रश्‍न हा रायगडपुरताच मर्यादित नाही आणि पर्यटन साक्षरतेची मोहीम जिल्ह्याबाहेरही राबविला गेली तर निदान रायगडातच नव्हे तर इतर जिल्हांतही पर्यटनसाक्षर पर्यटकांचा वावर सुरु होऊन दुर्घटनांचे प्रमाण कमी होईल आणि जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा यावर ताण पडणार नाही.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

वर्षासहलीसाठी बेस्ट माथेरान डेस्टिनेशन

इतिहासाची आठवण करून देणारा कोथळीगड

Related posts
Your comment?
Leave a Reply