दिघी पोर्ट मार्गावर दोन ट्रेलरमध्ये अपघात

127 Viewed Raigad Times Team 0 respond

जीवितहानी नाही; रस्ते चांगले नसताना होतेय अवजड वाहतूक, अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

रायगड टाइम्स ।
बोर्लीपंचतन । श्रीवर्धन तालुक्यातील वडवली – दिघी मार्गावरील वेळास येथे मंगळवारी (दि.20) रात्री 3 वाजता दिघी पोर्ट कडून वाहतुक करणार्‍या दोन ट्रेलरच्या दरम्यान मोठा अपघात घडला. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही ट्रेलरचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन ड्रायव्हर जखमी झाला आहे.
ट्रेलरला रस्त्याच्या मध्यभागी झालेल्या या अपघातामुळे वाहने ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यानंतर बुधवारी (दि.21) सकाळी क्रेनच्या साहाय्याने हा अपघातग्रस्त झालेला ट्रेलर बाजूला करण्यात आला. त्यानंतर वाहने सुरळीत जाण्यास सुरुवात झाली. दिघी पोलिस ठाण्याचे अधिकारी डी.टी. सोनके यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. बारावीची परीक्षा सुरू झाल्याने दिघीकडून श्रीवर्धनकडे जाणारी वाहतूक सर्वे मार्गे वळविण्यात आली.
माणगाव – वडवली – दिघी मार्गावरील ओव्हरलोड व अवजड वाहतूक ही सद्यस्थितील सर्वात मोठी समस्या असून ओव्हरलोड वाहतूक प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक व जीवघेणी ठरत आहे. खडतर रस्ते व नागमोडी वळणांमुळे व वहानचालकांनी वेगाची ओलांडलेली मर्यादा यामुळे या मार्गावर सतत लहानमोठ्या अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. अशा अपघातात अनेक निष्पाप जिवांना हकनाक जीव गमवावा लागत असल्याने सदर रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अपघाती वळणावर दिघी पोर्टकडून बालाजी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रेलर हा माणगाव येथील पॉस्कॉ कंपनीत जात असताना ब्रेक फेल झाल्याने समोरासमोर दोन्ही ट्रेलरचा अपघात झाला. तर आयडियल ट्रान्सपोर्टचा दुसरा ट्रेलर दिघी पोर्टकडे जात होता. हा अपघात पहाटेच्या सुमारास झाल्याने व रस्त्यावर किरकोळ वर्दळ असल्याने कोणतीही जीवितहानी घडली नाही. तरीदेखील अशा अवजड व धोकादायक वाहतुकीमुळे वाहनचालक, प्रवासी व रस्त्यालगतच्या गावातील नागरिकांमधुन दाट भिती वर्तवली जात आहे. सदर मार्गावरील अवजड व ओव्हरलोड वाहतूक तातडीने बंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
कुठे आहेत परिवहन अधिकारी ?
माणगाव – वडवली – दिघी या मार्गावरील वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच वाढते अपघात रोखण्यासाठी प्रादेशिक वाहतूक परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे; मात्र अवजड वाहतूकही होतच आहे.
उपाययोजना नाही मात्र वाहतूक सुरुच
माणगाव – दिघी मार्गावर चांगले रस्ते नसतानादेखील दिघी पोर्टची अवजड वाहतूक सुरूच आहे. अवजड वाहतुकीची क्षमता नसलेल्या रस्त्यांवर साधारण चाळीस टन वजनाची कॉईल वाहतूक होत आहे. गावानजीक ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण असेल असा प्रश्न ग्रामस्थ विचारतात. मात्र अधिकार्‍यांकडून याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

रोहा एमआयडीसीत…

कांळबादेवी युवक मंडळ गडब आयोजित कबड्डी स्पर्धा

Related posts
Your comment?
Leave a Reply