जिल्हा क्रीडा संकुल टँकर भरोसे

1024 Viewed Raigad Times Team 0 respond
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
  • पायाभूत सोयीसुविधांची बोंब

अलिबाग । प्रतिनिधी ।  ‘नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्नं’ अशी एक म्हण आहे. तशीच काहीशी अवस्था झालेल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुसर्‍या टप्प्याचे उद्घाटन अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. गेली 12 वर्षे रखडलेल्या आणि अनेकवेळा उद्घाटनाचे अयशस्वी प्रयत्न झालेल्या क्रीडा संकुलाचे उद्घाटन झाले खरे; मात्र या संकुलात अजुनही पायाभूत सुविधांचा अभाव असल्याची कबुली देण्याची नामुष्की क्रीडा मंत्री विनोड तावडे यांच्यावर आली. संकुलाची रंगरंगोटी आणि काही पायाभूत सुविधा लवकरच उपलब्ध करुन एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल तयार करु, असे सांगत वेळ मारुन नेण्याची पाळी त्यांच्यावर आली.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी अणि जिल्हा क्रीडा संकुल समिती यांच्यामार्फत झालेल्या या क्रीडा संकुलाची पायाभरणी 2003 साली झाली होती. सुमारे 16 करोड रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या या क्रीडा संकुलात आजही पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे येथे उद्घाटनाला जमलेल्या जनतेमध्ये चांगलीच चर्चा 20150607_103121रंगली होती. इनडोअर हॉलमधील अस्वच्छता आणि कोळीस्टर पाहून क्रीडामंत्र्यांनीही नापसंती व्यक्त केली.
क्रीडा संकुलाच्या दुसर्‍या टप्प्यात 1.400 मीटरचे धावपथ, विविध खेळांची मैदाने, जलतरण तलाव, अंतर्गत रस्ते व पार्किंग, प्लिथं प्रोटेक्शन अशा कामांसाठी 4 कोटी 78 लाख 53 हजार 200 मंजूर करण्यात आले आहेत. तसेच ही सर्व काम मे 2012 पर्यंत देण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात हे काम पूर्ण झालेले दिसत नाही. त्यामुळे संबंधीत ठेकेदार औरंगाबाद येथील हरी असो. यांना अंदाजपत्रकात 3 टक्के अधिक दराने वाढ तसेच 15 महिने म्हणजे 4 मार्च 2015 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली. मात्र काम काही पूर्ण झालेले दिसत नाही. पाणी, वीज आणि रस्ता नाही हे कारण सांगत या क्रीडा संकुलाचे काम आणि उद्घाटन तब्बल 12 वर्षे रखडवले. आज वीज आली आहे मात्र पाण्याचा ठिकाणा नाही. पाण्यासाठी 1 कोटी 90 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडे हे काम आहे. या कामाचे पाईप पडले आहेत, मात्र प्रत्यक्षात पाणी कधी येणार, हे निश्‍चित सांगता न येण्यासारखे आहे. रस्त्यासाठीही 80 लाख रुपये मंजूर आहेत त्याचेही काम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे आहे; परंतु रस्त्याचेही काम अपूर्ण आहे.
पाणी नाही, पूर्ण रस्ता नाही, धावपथाचे काम बाकी आहे. मैदानाची नीट निगा नाही, पहिल्या टप्प्यातील कामे आता जुनी झाली आहे. एकंदरीत क्रीडा संकुलाच्या दुसर्‍या टप्प्याचे काम पूर्ण झालेले नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रियमंत्री अनंत गीते, क्रीडामंत्री विनोड तावडे, पालकमंत्री प्रकाश मेहता, आमदार पंडित पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांना बोलावून उद्घाटन करण्याची घाई नेमकी कोणाला आणि कशासाठी झाली होती, असा सवाल निर्माण झाला आहे.


मान गए एसपीसाहेब!
एरवी जिल्ह्यात होणार्‍या विविध कार्यक्रमात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत पोलिस अधिक्षकांनाही व्यासपीठावर बसलेले पाहिले जाते. आज जेव्हा आयोजकांनी स्वागतासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक मो.सुवेझ हक यांचे नाव पुकारले तेव्हा सर्वांचेच लक्ष स्टेजवर गेले; मात्र व्यासपीठाखाली एका कोपर्‍यातून पुढे येत हक यांनी हे स्वागत स्वीकारले, तेव्हा सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. हक यांनी जेव्हा रायगड जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक पद स्वीकारले तेव्हाच त्यांनी काही गोष्टी पत्रकारांसमोर स्पष्ट केल्या होत्या. त्याची झलक रविवारी या कार्यक्रमात पहायला मिळाली. मान गए एसपीसाहेब, अशीच प्रतिक्रिया त्यानंतर उमटली.


पाणी आणि रस्त्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलाचे काम खुप वर्षे रखडले होते. फक्त पाण्याचीच अडचण होती. इतका खर्च करुन उभारलेले संकुल केवळ पाण्यासाठी वापरात येऊ नये, हे खेळाडूंसाठी ठिक नव्हते. त्यामुळे पाणी उपलब्ध होईपर्यंत आम्ही टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणार आहोत. पावसाच्या आधी रस्ता आणि पाणी ही दोन्ही कामे पूर्ण होतील. जिल्ह्यातील खेळांडूसाठी क्रीडा संकुल पूर्णपणे सज्ज आहे. त्यामुळे विविध क्रीडा स्पर्धांसाठी हे मैदान निःशुल्क उपलब्ध होऊ शकेल. जलतरण तलावासाठी नाममात्र फी आकारण्यात येणार आहे.
– सुनिता रिकामे,
जिल्हा क्रीडा अधिकारी

News Feed
Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

रायगडात पाऊस; 77 मिमी पावसाची नोंद

खानाव ग्रामपंचायत आयएसओ दर्जा कायम टिकविणार – अनंत गोंधळीगावातील विविध विकासकामांचे उद्घाटन

Related posts
Your comment?
Leave a Reply