रायगडात स्वातंत्र्यदिन उत्साहात

772 Viewed Raigad Times Team 0 respond
  • पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
  • उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या गुणवंतांचा गौरव

अलिबाग । प्रतिनिधी । भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 68 वा वर्धापन दिन शनिवारी येथील पोलिस परेड मैदानावर उत्साहात साजरा करण्यात आला. गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेज हक, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, जिल्हा परिषदेच्या वित्त व बांधकाम सभापती चित्रा पाटील, शिक्षण व आरोग्य समिती सभापती भाई पाशिलकर, समाज कल्याण सभापती गीता जाधव, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष मोळवणे उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देऊन पालकमंत्री म्हणाले की, जिल्हा प्रशासन आपत्तीच्या प्रसंगी उत्तम कार्य करीत असून त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. राज्यस्तरावर देखील नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शासनाने अल्प मुदतीच्या कर्जाचे रुपांतर मध्यम मुदत कर्जामध्ये केले आहे. जे शेतकरी कर्जाचा वार्षिक हफ्ता बँकेत विहित मुदतीत भरतील त्यांच्या कर्जावरील व्याज 2015-16 मध्ये माफ करण्यात येणार आहे. पुढील चार वर्षासाठी 6 टक्के दराने व्याज भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचप्रमाणे राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना व्हावा यासाठी या योजनेतील अटी शिथील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दारिद्र्यरेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारकांनाही या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल. महसूल प्रशासनाने या वर्षी 51 शिबिरांचे आयोजन करुन 13 हजार 593 दाखल्यांचे वापट केले. दळी जमिनींबाबत जिल्हास्तरीय समितीने 663 दावे मंजूर करुन त्यांना टायटल प्रमाणपत्र दिले आहे. ज्या योगे 241.81 हेक्टर आर वनक्षेत्रावर आदिवासींना हक्क देण्यात आला आहे. कालबध्द कार्यक्रम आखून प्रशासन हा उपक्रम राबवत आहे. सर्वसामान्यांना तत्पर सेवा देण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत सुरू असल्याचे पालकमंत्री मेहता म्हणाले.

महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार
जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना शासनस्तरावर राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत 346 कामे पूर्ण करण्यात आली असून त्यासाठी 671.18 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे. भविष्यातही जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबवावी. शासनाने नव्याने 1 लाख विहिरी व 50 हजार शेततळ्याचा कार्यक्रम घेण्याचे ठरविले आहे. त्याची सुरूवातही आजपासून संपूर्ण राज्यात होत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानदेखील यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. महिलांची सुरक्षा हा महत्वाचा विषय असल्याने महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यात 16 संरक्षण अधिकारी कार्यरत आहेत.
दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरीडॉर अंतर्गत जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र म्हणून लागू केलेल्या 50 गावांपैकी 24 गावांमधील 6307.188 हेक्टर आर जमिनीच्या संपादनाची कार्यवाही संबंधितांच्या सहमतीनेच सुरू आहे. भूसंपादन संस्थेकडून 350 कोटी रुपये नुकसान भरपाई रक्कम प्राप्त झाली. त्यापैकी 336 कोटी रुपये रकमेचे वाटपही करण्यात आले. तसेच जिल्ह्याच्या विविध प्रशासकीय विभागांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे कौतुक पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात केले. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या समारंभासाठी स्वातंत्रसैनिकांच्या पत्नी, जिल्हा सरकारी वकील प्रसाद पाटील, अपर जिल्हाधिकारी प्रविण शिंदे, अपर पोलीस अधिक्षक राजा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाथ गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी सतिश बागल, अलिबाग प्रांत दिपक क्षीरसागर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी विश्वनाथ वेटकोळी, जिल्हा पुरवठा अधिकारी लिलाधर दुफारे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.एल.कांबळे, जिल्ह्यातील विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी उपस्थित होते.


 

विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्ह्यातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या गुणवंतामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी खेळात प्राविण्य संपादन केल्याबद्दल विवेक गणेश थळे, तर हॉकी खेळामध्ये राष्ट्रीय पातळीवर प्राविण्य संपादन केल्याबद्दलरुपाली कृष्णांत पाटील, तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष यश संपादन केल्याबद्दल अपेजय स्कूल खारघरची विद्यार्थीनी मंडल तुंगाद्री, श्रीमती सुमतीबाई देव प्राथमिक विद्यालय पेणची विद्यार्थीनी सृष्टी रमेश दारकुंडे तसेच आदिवासी आश्रमशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांनी सत्कार केला.

News Feed
Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

जेएसडब्ल्यू तर्फे शहाबाज सार्वजनिक वाचनालयाला ग्रंथार्पण

अलिबाग भाजपतर्फे आदिवासीबांधवांना अवजारे वाटप

Related posts
Your comment?
Leave a Reply