घोणसे घाटात अपघातानंतर पेट्रोल, डिझेल पळवण्यासाठी लोकांची झुंबड

0
614

म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटात पेट्रोल, डिझेल वाहतूक करणार्‍या टँकरला अपघात

म्हसळा : म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटात रविवारी (24 मे) सकाळी पेट्रोल व डिझेल वाहतूक करणार्‍या टँकरला अपघात झाला आहे. मात्र या अपघातानंतर परिसरातील लोकांची पेट्रोल व डिझेल पळवण्यासाठी झुंबड उडाली होती.

घोणसे घाटातील अपघातग्रस्त टँकर रस्त्यामधून बाजूला काढताना क्रेन.

शिवडी येथून भारत पेट्रोलियमचा टँकर 8 हजार लिटर पेट्रोल व 4 हजार लिटर डिझेल घेऊन श्रीवर्धन येथील लांबे ऑटोमोबाईल येथे निघाला होता. मात्र रविवारी सकाळी म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटात चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने या टँकरचा अपघात झाला. अपघातानंतर चांदोरे, घोणसे व देवघर या परिसरातील लोकांची बादल्या, बाटल्या, ड्रम घेऊन डिझेल, पेट्रोल पळवण्यासाठी झुंबड पडल्याचे धक्कादायक दृश्य पहायला मिळाले. तब्बल 2 ते 3 हजार लिटर पेट्रोल व डिझेल या लोकांनी चोरुन नेल्याचे समजते. टँकरमध्ये असणारे उर्वरित पेट्रोल व डिझेल पैकी किमान 3 हजार लिटर पेट्रोल व डिझेल वाहून जाऊन नुकसान झाले.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच तहसीलदार शरद गोसावी, सर्कल दत्ता कर्चे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस निरीक्षक दिपक धूस, हवालदार भोईर व वाहतूक पोेलीस कारकिले हे घटनास्थळी पोहचले. त्यानंतर हा अपघातग्रस्त टँकर दक्षता घेत क्रेनमार्फत रस्त्यामधून बाजूला काढण्यात आला.