अलिबागमध्ये ‘येथे’ दरवर्षी भरते “पाण्यातली जत्रा”

0
304

अलिबाग । जयेश सावंत : अलिबागचा समुद्रकिनारा हा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करणारा किनारा म्हणून प्रसिद्ध आहे. अलिबाग तालुक्यातील आग्राव येथील गुढीपाडवा विशेष असतो, याचे कारण म्हणजे पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी एकविरा देवीच्या पालखीच्या निमित्ताने होणारी शिडाच्या होड्यांची स्पर्धा. गेल्या ४० वर्षांपेक्षा अधिक काळ आग्रावमध्ये ही स्पर्धा होत आहे.

या दिवशी अलिबागचा समुद्र रंगीबेरंगी होड्या आणि पताकांनी सजलेला असतो. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील अनेक गावकरी होड्या सजवून, आपल्या स्पर्धकाला प्रोत्साहन देण्यासाठी ढोलताशे घेऊन समुद्रात हजेरी लावतात. त्यामुळे समुद्रात होड्या आणि रंगांची जत्रा भरल्याचे चित्र निर्माण होते.

या शर्यतीच्या वेळी खाडीत विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने जिल्ह्यातून शर्यतप्रेमी हजेरी लावतात. यादिवशी दुपारी एकविरा मातेची पालखी वाजतगाजत संपूर्ण गावातून फिरवून गावाजवळच्या जेट्टीवर नेली जाते, किनाऱ्यावर रंगणारी कोळीनृत्ये, तयारी करून जेट्टीवर जमलेले ग्रामस्थ असा माहोल जमतो. आसपासच्या गावातील स्पर्धक आपापल्या देवी – देवतांचे दर्शन घेऊन स्पर्धेत सहभागी होतात. तर, गावागावातील गावकरी हे आपल्या स्पर्धकाला प्रोत्साहन देण्यासाठी सहकुटुंब आपापल्या होड्या सजवून, ढोलताशे घेऊन समुद्रात दाखल होतात.

साधारणपणे एका बोटीत 25 ते 30 तांडेल असतात. या शर्यतीच्या वेळी कुंडलिका खाडीत स्पर्धेत सहभागी नसलेल्या दोनशे ते अडीचशे इतर होड्या असतात. या प्रत्येक होडीत 50 ते 60 शर्यतप्रेमी असतात. ‘उत्सव शिडांच्या होड्यांचा, सण हाय आमच्या कोलीवाड्याचा’ असे फलक लावलेले असतात. यावेळी सर्व होड्यांना विविध रंगाचे झेंडे बांधलेले असतात. त्याचबरोबर होड्यांमध्ये ध्वनीक्षेपक व बेंजो असल्यामुळे गाण्याच्या चालीवर सर्वजण ठेका धरताना दिसत होते.

आग्रावच्या समुद्रात चालणारी शिडाच्या होड्यांची ही स्पर्धा पहायला मुंबई, ठाणे येथून देखील अनेक पर्यटक हजेरी लावतात. कोळीबांधवांचा हा उत्सव पाहण्यासाठी विदेशी पर्यटक देखील येतात आणि अनेक कोळीगीतांचे संगीतकार तथा गीतकार या सोहळ्याला आपली आवर्जून हजेरी दर्शवितात. दिवसेंदिवस या स्पर्धेचे आकर्षण वाढू लागल्याचे दिसत आहे.

या संपूर्ण स्पर्धेचा आढावा रायगडातीलच ६ तरुणांनी व्हिडिओच्या माध्यमातून घेतला होता. हे तरुण THE ULTIMATE SQUAD नावाने एक यूट्यूब चॅनेल चालवितात. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांवर फिरून अगदी स्वस्तात सहल एन्जॉय कशी करावी याची माहिती देतात. हा आहे शिडाच्या होड्याच्या स्पर्धेचा व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here