सलग दुसऱ्या दिवशी सिनेसृष्टीला धक्का,अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

0
213

मुंबई : काल बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खान चाहत्यांना सोडून गेला आणि आज बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते व तुमचा आमचा ‘चिंटू’ अर्थात ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेत सगळ्यांना मोठा धक्का दिला.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर भारतात परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला. इरफान पाठोपाठ ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. अख्खे बॉलिवूड शोकमग्न झाले आहे. चाहतेही शोकाकूल आहेत.

ऋषी कपूर गेल्या वर्षभरापासून कर्करोगाशी लढत होते. काल रात्री उशिरा त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांची त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केलेत. पण हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरलेत. 2018 मध्ये ऋषी कपूर कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. तेथे 11 महिने उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले होते.

ऋषी कपूर यांनी बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. पहिलाच सिनेमा ‘बॉबी’ सुपरडुपर हिट झाला आणि त्यानंतर अनेक वर्षे ऋषी कपूर यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या पश्चात अभिनेता रणबीर कपूर, मुलगी ड्रेस डिझाइनर रिद्धिमा कपूर आणि पत्नी नीतू असा परिवार आहे.