खोपोलीत विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू

0
806

वादळी पावसामुळे तुटलेल्या जिवंत वीज वाहिनीला झाला स्पर्श

संदीप ओव्हाळ/खोपोली । खोपोलीतील धाकटी पंढरी विठ्ठल मंदिराच्या पायथ्याशी जडी-बुटी विक्री करणार्‍या संजयसिंग चितोडीया यांच्या आठ वर्षांच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (30 एप्रिल) दुपारी घडली.
संजयसिंग चितोडीया (रा.सांगली) हे कुटुंबासह ताकई येथील धाकटी पंढरी मंदिराच्या पायथ्याशी जडी-बुटी (वन औषधीय) विक्री करतात. याठिकाणच्या पटांगणातच ते राहतात. त्यांचा मुलगा सिजन चितोडीया (वय 8 वर्षे) हा मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या झाडीत गेला होता. मात्र बुधवारी झालेल्या वादळी पावसामुळे झाडांची पडझड होऊन वीज वाहिनीही तुटून पडली होती. मात्र ही बाब सिजनच्या लक्षात आली नाही. नकळत त्याच्या हातात जिवंत विद्युत वाहिनी पडल्याने सिजनचा विजेच्या तीव्र धक्क्याने जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार इरेश चप्पलवार, नगरसेवक सुनील पाटील, वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता महेश गोरी, ग्रामस्थ रमाकांत रावळ, सन्नी पाटील, विवेक पाटील आदी घटनास्थळी पोहोचले. मृत मुलाचे शव विच्छेदनासाठी खालापूर प्राथमिक रुग्णालयात पाठविण्यात आले.
या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश असवर हे करीत आहेत.