बंद केलेला आंबेत पूल केला खुला

0
129
  • खा. सुनील तटकरे यांच्या प्रयत्नामुळे रहदारीचा मार्ग मोकळा

म्हसळा । मंडणगड, दापोलीमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा आंबेत पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे आसपास राहणार्‍या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. खा. सुनील तटकरे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अखेर दोन दिवसांनी हा पूल खुला करण्यात आला असून, रहदारीचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. बॅ.ए.आर. अंतुले यांनी त्यांच्या कार्यकाळात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा आणि अत्यंत आवश्यक असणार्‍या सावित्री नदीवरील आंबेत पुलाची उभारणी केली. रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यालगतच्या गावातील लोकांना आजूबाजूला शहरांकडे जाणारा आंबेत पूल हा महत्वाचा दुवा आहे. सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोलीमध्ये लागोपाठ कोरोनाचे रुग्ण सापडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आंबेत पूल रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आला होता.
रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ, पंदेरी, बाणकोट आदी शेजारील गावांतील लोकांना बाजारहाट, वैद्यकीय सेवा-सुविधा घेण्यासाठी माणगाव, गोरेगाव, महाड, अलिबाग ठिकाणी जावे लागते. त्यातच शेतीचा हंगाम जवळ आल्याने अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्यासाठी दोन जिल्ह्यांतील लोकांना आंबेत पूल मार्ग हा एकमेव महत्त्वाचा दुवा आहे. सध्या आंबे काढणी व खरेदी-विक्री सुरु असल्याने आंबा बागायतदारांना आजूबाजूच्या गावांत जावे लागते.
आंबेत मार्गच बंद करण्यात आल्याने आणि लॉकडाऊन कालावधीत लोकांच्या दैनंदिन व्यवहारात पुरता खोळंबा झाला. म्हाप्रळ येथील बाजारपेठेवर तसेच मुख्य शहरातील अत्यावश्यक सेवेवरही याचा परिणाम होत होता. त्यामुळे कोरोनाच्या या बिकट काळात नागरिकांच्या चिंतेत अधिकच भर पडली. आंबेत पूल मार्ग पूर्ववत चालू करण्यासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे नागरिकांनी मागणी केली होती.
खा. तटकरे यांनी रायगड, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, संबंधीत तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून दोन दिवस बंद करण्यात आलेला हा मार्ग जिल्हा प्रशासनास सुरु करण्यास सांगितले. अखेर आज (8 मे) हा मार्ग सुरु झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. दरम्यान, आंबेत येथील सामाजिक कार्यकर्ते नाविद अंतुले यांनी समाधान व्यक्त करत येथील जनतेच्यावतीने खा. सुनील तटकरे यांना धन्यवाद दिले आहेत.