साजगांव ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचा शिरकाव; सारसन, साजगांवात 2 रुग्ण आढळले

0
755

संदीप ओव्हाळ/खोपोली : खालापूर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केला आहे. साजगांव ग्रामपंचायत हद्दीतील सारसनमध्ये 52 वर्षीय व्यक्ती आणि साजगांवमध्ये 30 वर्षीय तरुणाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या दोघांवरही नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. 

खोपोली शहरात कोरोनाचे रुग्ण सापडत असले तरी तालुक्यातील शहराला लागून असलेला ग्रामीण भाग सुरक्षित होता. मात्र आता ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे. खोपोली शहराला लागून असलेल्या साजगांव ग्रामपंचायत परिसरात कोरोना महामारीचे संकट येऊ नये, यासाठी असंख्य प्रयत्न करीत ग्रामपंचायत कोरोना मुक्त ठेवण्यासाठी रात्रंदिवस काम सुरु होते. मात्र ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचे 2 रुग्ण सापडले आहेत. सारसन येथील एका 52 वर्षीय व्यक्तीचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. याच व्यक्तीच्या संपर्कात आल्याने साजगांव येथील 30 वर्षीय तरुणालाही कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांवरही नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

साजगाव आणि सारसन येथे आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी भेट देऊन पाहणी करत दोन्ही ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत. दोन्ही पॉझिटीव्ह व्यक्तीच्या कुटुंबियांचे घरातच अलगीकरण केले जाणार आहे. आरोग्य सहाय्यक शाम गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, सरपंच अजित जाधव, उपसरपंच नितीन पाटील, सदस्य अजित देशमुख, विराज देशमुख, ग्रामविकास अधिकारी रश्मी शिंदे यांनी तातडीने हालचाली करत ग्रामस्थांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी यासाठी हालचाली सुरू केल्या आहे.

गावातील संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या दोन रूग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करून घरीच अलगीकरण केले जाणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी रश्मी शिंदे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here