कोरोना : आतापर्यंत रायगडातील  23 संशयित कस्तुरबा रुग्णालयात दाखल

0
1941

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील आतापर्यंत  23 संशयितांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहेत. त्यातील 19 संशयित एकटय़ा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील आहेत, तर दोन खालापूर आणि प्रत्येकी एक संशयित हे खोपोली आणि मुरुड तालुक्यातील आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रमोद गवई यांनी दिली.
मुरुड तालुक्यातील संशयित हा सिंगापूरला जॉब करण्यासाठी गेला होता. काही दिवसांपूर्वी त्याला मुरुड येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. शनिवारी त्याला त्रास जाणवू लागल्याने प्रथम अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर दुपारनंतर त्याला मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयामधील विलगीकरण कक्षात नेण्यात आले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. आरोग्य विभागानेही चांगलीच कंबर कसलेली आहे. रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. परदेशातून भारतामध्ये आणि प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात येणा-यांचे प्रमाण अधिक असल्याने त्यातील सर्वानाच विविध ठिकाणच्या निगरानी कक्षात ठेवण्यात आले आहे.
20 मार्च 2020 पर्यंत 22 संशयितांना कस्तुरबा येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यामध्ये 19 संशयित हे पनवेल महानगरपालिका हद्दीतील आहेत, तर खालापूर तालुक्यातील दोन आणि खोपोलीमधील एका संशयितांचा समावेश आहे. पैकी 16 संशयितांचे नमुने घेण्यात आले. त्यातील एकच पॉझिटीव्ह आढळला होता, तर 14 जणांचा अहवाल नेगेटिव्ह आला आणि एकाच अहवाल प्रलंबित आहे. सहा जणांचे नमुने घेण्याची गरज नसल्याने त्यांचे नमुने घेण्यात आले नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

21 मार्च 2020 रोजी मुरुड तालुक्यातील एका संशयिताला शनिवारी दुपारनंतर कस्तुरबा येथील रुग्णालयातील विलगीकरण कक्षात नेण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संशयितांचा आकडा हा 23 वर गेला आहे. सदरचा संशयिताला सध्या कस्तुरबा येथे नेण्यात आल्याने तेथे त्याचे नमुने घेण्यात येणार आहेत, असेही डॉ. गवई यांनी स्पष्ट केले.