अलिबाग लाँच सेवा विनाकारण महागली !

0
2337
  • तिकीटांचे दर 15 ते 25 रुपयांनी वाढले
  • प्रवाशांना भुर्दंड

अलिबाग । ना भरती आली, ना ओहोटी, ना वादळ आले ना, त्सुनामी…डिझेलचे दरदेखील वाढले नाहीत…मग गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा ही लाँच सेवा का महागली? हा एकच प्रश्‍न मंगळवारी (दि.3) दिवसभर अलिबागमध्ये चर्चेचा विषय होता. 15 ते 25 रुपयांनी दरवाढ झाली असून तिकीट दर वाढीमध्ये पीएनपीने द्विशतक झळकावले आहे. त्यामुळे जलमार्गावरुन प्रवास करणार्‍यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग तालुक्यातील मांडवादरम्यान जलप्रवासी वाहतूक केली जाते. दरवर्षी जवळपास 15 लाख प्रवासी या जलवाहतूक सेवेचा लाभ घेत असतात. मुंबई ते अलिबाग प्रवास म्हणजे एक वेगळे पर्यटन आहे. असे असले तरी रोज या मार्गावरुन ये-जा करणार्‍यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या सेवेचे म्हत्व अलिबाग, रोहा आणि मुरुड तालुक्यांसाठी मोठे आहे. या मार्गावरुन प्रवास करण्यासाठी पूर्वी 145 ते 195 रुपयांचा दर आकारला जात होता. यात 20 रुपये प्रवासी कर आणि 5 रुपये सुरक्षा कराचा समावेश होता.

आता मात्र या जलवाहतुकीसाठी 165 ते 215 रुपये मोजावे लागणार आहेत. तिकिट दरांत 15 टक्के वाढ करण्यात आली आहे. तर मुंबईहून एलिफंटा बेटावर जाणार्‍या डिलक्स बोटींच्या दरात 15 ते 20 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टला हा दरवाढ करण्याचा झटका आला असून त्यांनीच या सुधारीत दरपत्रकांची घोषणा केली आहे. मात्र यामुळे जलप्रवास करणार्‍या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार असून, प्रवाशांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.