चक्रीवादळ नुकसाग्रस्तांच्या खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये प्रचंड गर्दी

0
44

पैसे काढले नाहीत तर परत जाण्याची अफवा

अभय पाटील/बोर्लीपंचतन : ‘चक्रीवादळ नुकसाग्रस्तांच्या खात्यात जमा झालेली मदतीची रक्कम परत जाईल’ अशी अफवा श्रीवर्धन तालुक्यातील बोलीपंचतन परिसरात पसरल्यामुळे बँकेसमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली. या गडबडीत शारिरीक अंतर राखण्याचेही भान कोणाला राहीले नाही. अनेकांनी तर तोंडाला मास्कदेखील लावले नव्हते. त्यामुळे कोरोनाचे संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.

चक्रीवादळामुळे किनारपट्टीचे मोठेे नुकसान झाले आहे. हजारो नागरिकांच्या घराची पडझड झाली आहे. सरकारने दिलेल्या मदतीची रक्कम श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील महाराष्ट्र बँकेत जमा झाली आहे. मात्र हे पैसे लवकर काढले नाही तर सरकारकडे परत जातील, अशी अफवा पसरल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली. पैसे काढण्यासाठी बोर्लीपंचतन येथील बँकेसमोर भली मोठी रांग लागली.

यादरम्यान कोरोनाबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे दिसून आले. शारिरीक अंतर कोणीही राखताना दिसत नव्हते. अनेकांनी तर मास्कदेखील लावले नव्हते. अशाच प्रकारे जर घडत राहीले तर कोरोनाचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, ग्राहकांच्या खाती जमा झालेली रक्कम कुठेही परत जाणार नाही. ती रक्कम केव्हाही ग्राहक काढू शकतात. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये व कोरोनाच्या काळात उगीच गर्दी करू नये, असे आवाहन बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी जतीन हैलकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here