चक्रीवादळग्रस्तांचे पंचनामे अद्याप अपूर्ण; मदत मिळणार कधी? ; विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा सवाल

0
603

अलिबाग । कोकणातील चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेले कोकणवासीय सावरले नाहीत. सरकारने नुकसानभरपाईची केलेली घोषणा ही अतिशय तुटपुंजी आहेत. नुकसानभरपाई देतानाचे निकषही चुकीचे आहेत. पंचनामे पूर्ण झाले नसतील तर नुकसानग्रस्ताने मदत मिळणार कधी? असा सवाल विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. सरकारने फक्त घोषणा केल्या प्रत्येक्षात मदत करताना हात आकडता घेतल्याची टीका त्यांनी केली.


प्रविण दरेकर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासमवेत रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग-रायगड येथे कोरोना नियंत्रणाबाबत व निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी आमदार रविंद्र पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, सीईओ दिलिप हळदे यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. ते म्हणाले की, निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या नुकसानीचे काही पंचनामे पूर्ण झाले असून काही अजूनही अपूर्ण आहेत. जे पंचनामे राजकीय उद्देशाने गावस्तरावर आणि तालुकास्तरावर झाले आहेत त्याची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे.
बागायतदारांचे नुकसान झालं त्यासाठी शेतकर्‍यांना 50 हजार इतकी तुटपुंजी मदत सरकारने जाहीर केली. नुकसानभरपाई देत असताना प्रत्येक झाडामागे नुकसानभरपाई द्या अशी मागणी आम्ही केली. याला आदरणीय शरद पवार यांनी देखील दुजोरा दिला. असे असताना 50 हजार हेक्टरी मदतची घोषणा राज्य शासनाने केली ही अत्यंत तुटपुंजी आहे. या मदतीचा कोकणवासीयांना काडीमात्र उपयोग होणार नाही.एक झाड पंधरा ते वीस वर्ष उत्पन्न देतं.इतक्या वर्षाचं पीक उद्ध्वस्त झाल्यानंतर 50 हजार इतकी राज्य शासनाची मदत कूचकामी असल्याची टीका दरेकर यांनी केली

कोकणातील बागा उध्वस्त झाल्याने येथील बागायतदार पूर्णपणे हवालदिल झाला आहे. त्याला पुन्हा उभा करण्यासाठी फलोत्पादन करणे आवश्यक आहे. तरी फलोत्पादनासाठी बी-बियाणं , झाड रोप सरकारने मोफत द्यावी. यासाठी कोणतेही पैसे आकारले जाऊ नये अशी मागणी त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here