जेएसडब्ल्यूने दबाव तंत्र ‘रायगड टाइम्स’वर आजमावू नये!

0
891

वडखळ डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनी माहित नाही, असा एकही रायगडकर नाही. ‘स्थानिक’ या शब्दाचा कायदेशीर आधार घेत भूमिपुत्रांना डावलणारी कंपनी म्हणजे जेएसडब्ल्यू. दिवस-रात्र धुरांडी हवेत सोडून रायगडचे पर्यावरण खराब करणारी कंपनी. प्रदुषणामुळे डोळे फुटायची आणि उग्र वासामुळे नाकातील केस जळायची वेळ या कंपनीने आणली आहे. प्रशासन आणि काही नेत्यांना खिशात घेऊन फिरणार्‍या या कंपनीच्या बुडातून ‘रायगड टाइम्स’ने धूर काढला आहे. हा धूर नाका-तोंडात गेल्यानंतर जेएसडब्ल्यूने दबाव तंत्राचा वापर सुरु केला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या बातम्यांना खोट्या ठरविण्यासाठी खटाटोप सुरु केला आहे. अर्थातच प्रशानसाची साथ असल्याशिवाय तेही असली डेरींग करणार नाहीत.

रायगड जिल्ह्यात 1 हजारपेक्षा जास्त कंपन्या आहेत. यातील साडेतिनशे कंपन्या सुरु असल्याचे रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांनी म्हटले आहे. असे असताना ‘रायगड टाइम्स’ गेल्या पंधरा दिवस जेएसडब्ल्यू कंपनीविरोधात आवाज उठवत आहे. याचे एकमेव कारण आहे, ते म्हणजे कोरोना… कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये, यासाठी सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे. हातावर पोट असलेला सर्वसामान्य माणूस कामधंदा सोडून घरी आहे. सर्वांनाच या कोरोनाची धास्ती आहे. अपवाद फक्त जेएसडब्ल्यूचा. या कंपनीला नाही कोरोनाची धास्ती, नाही रायगडकरांच्या जीविताची पर्वा. यांना टेंशन फक्त आर्थिक नुकसानीचे.

…आणि त्याचमुळे या कंपनीने जिल्हा प्रशासन आणि रायगडच्या जनतेला वेठीस धरले आहे. अरे बाबांनो, जगाल तर कंपनी चालवाल ना… तुम्हाला नसेल जगायचे; पण इतरांचे जीव धोक्यात कशाला घालता? हाच जनतेचा प्रश्‍न घेऊन ‘रायगड टाइम्स’ भांडत आहे. पनवेल आणि नवी मुंबईचा कोरोना रुग्णांचा आकडा जसा जसा बातम्यांमधून कानावर पडतो, तसतशी अलिबाग आणि पेणमधील नागरिकांच्या जीवाची घालमेल होते. आपण घरी बसलो; पण जेएसडब्ल्यूचे कर्मचारी तर घेऊन येणार नाहीत ना?

याच घबराटीतून अलिबागमधील अनेक नागरी वसाहतींनी तसे पत्र प्रशासनाला दिले आहे. पोलिसांकडे बोलणेही करत आहेत. जिल्हा प्रशासनाने यावर काय कारवाई केली? याची माहिती अजून तरी मिळालेली नाही. परंतु तक्रार करण्यासाठी गेलेल्या नागरिकांनाच दमदाटी होत असल्याच्या तक्रारी आहेत. ‘रायगड टाइम्स’कडे जेव्हा लोक आपले दुःख व्यक्त करतात, तेव्हा त्यांना काय उत्तर द्यायचे? जिल्हाधिकारी आणि पोलीस तुमच्या संरक्षणासाठी, तुमचे हक्क, अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आहेत, हे कुठल्या तोंडाने सांगणार? अशी आजची परिस्थिती आहे.

जेएसडब्ल्यू कंपनीची मुजोरी इथेच संपत नाही. लोकांचा वाढता विरोध आणि ‘रायगड टाइम्स’चा आवाज दाबण्याचा प्रयत्न कंपनीने सुरु केला आहे. खोटी बातमी दिल्याची तक्रार कंपनीने पोलिसात दिली आहे. ‘रायगड टाइम्स’ला याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतू सोशल मीडियात अशाप्रकारे तक्रार केल्याची प्रत व्हायरल होत असल्याचे शेकडो फोन आहेत. अशी तक्रार दाखल करुन घेणार्‍या पोलिसांच्या तत्परतेला सलाम करायला हवा. दुसरे शब्द नाहीत.

‘रायगड टाइम्स’ला गेल्याच महिन्यात दहा वर्षे झाली. कोरोनामुळे आमच्याही ते लक्षात राहिले नाही. परंतू या दहा वर्षांत साधा खुलासा छापण्याची वेळदेखील ‘रायगड टाइम्स’वर कधी आली नाही. इतक्या काटेकोर आणि एखाद्याला विनाकारण त्रास होऊ नये, याची काळजी आम्ही घेतली आहे. आणि चूक झाली असतीच तर खुलासा काय, माफी मागण्यातही कमीपणा वाटणार नाही. ती संधीदेखील जिल्हा प्रशासनाने दिली नाही. मात्र खर्‍या बातमीविरोधात जेएसडब्ल्यूने केलेली तक्रार ‘खोटी’ असल्याचे ठामपणे सांगू शकतो.

जेएसडब्ल्यूने ‘रायगड टाइम्स’ आणि अन्य एका दैनिकावर अशी तक्रार का केली? याचा हेतू लक्षात घेण्यासारखा आहे. तक्रारीची प्रत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. त्यासोबत एक मेसेज देण्यात आला होता तो अगदी बारकाईने वाचा, “जेएसडब्ल्यू कंपनीच्या विरोधात करोनासंदर्भातली खोटी बातमी पसरविल्याबद्दल कंपनी प्रशासनाने रायगड टाइम्स व नवराष्ट्र यांच्यावर अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे व कंपनी मानहानीचा सुद्धा दावा दाखल करणार आहे. कृपया अफवा पसरवू नये व अफवांवर विश्‍वास ठेवू नये.”

यालाच म्हणतात दबाव तंत्र…

जेएसडब्ल्यूच्या विरोधात ‘रायगड टाइम्स’ने आवाज उठवला आहेच; परंतु स्थानिक जनतेमधूनही प्रंचड रोष निर्माण व्हायला लागला होता. याची दखल अलिबागमधील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना घ्यावी लागली होती. त्यांनीदेखील बुधवारी (दि. 8 एप्रिल) रायगडचे पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जनतेच्या भावना सांगितल्या. कंपनीने मात्र इथे आपल्या मुजोरी आणि दबाव तंत्राचा अवलंब केला. जनतेची भाषा बोलणार्‍या ‘रायगड टाइम्स’वरच एफआयआर दाखल झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला. तसेच दोन दैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत, अशा लोकांसमोर बढाया मारुन त्यांना घाबरविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे जनतादेखील घाबरुन जाईल. कंपनीबाबत बोलायला पुढे येणार नाही. जेएसडब्ल्यूचे हेच षङयंत्र लोकांनी लक्षात घ्यायला हवे.

1 हजार कंपन्या जिल्ह्यात आहे. कोणाचे उंबरे झिजवायला किंवा पाच पैशांची जाहिरात मागायला ‘रायगड टाइम्स’ यांच्या दाराशी कधीच गेला नाही. यामागे एकच कारण आहे. जनता. ‘एक तरी शिल्लक राहिला पाहिजे’ अशी या मागची भावना आहे. सगळेच जर मिंधे झाले, विकले गेले तर जनतेची बाजू घेणार कोण? आज कोरोनाच्या निमित्ताने जनतेची बाजू घेण्याची संधी ‘रायगड टाइम्स’ला मिळाली. मला खात्री आहे, आपण सगळे रायगडकर ‘रायगड टाइम्स’च्या मागे आहात!

‘रायगड टाइम्स’ असल्या खोट्या केसेसना घाबरत नाही आणि दबाव तंत्राचे असले निरर्थक अस्त्र आमच्यावर चालणार देखील नाही. यानिमित्ताने जिल्हा प्रशासन आणि एका बलाढ्य कंपनीची चाकरी करणार्‍यांनी एक नैसर्गिक कृती कायम लक्षात ठेवावी, कोणतीही गोष्ट जितक्या शक्तिनिशी दाबण्याचा प्रयत्न केला की ती तेवढ्याच वेगाने वर येते.

धन्यवाद!

  • राजन वेलकर,
    संपादक, रायगड टाइम्स

(ताक : पनवेल, नवी मुंबईतून जेएसडब्ल्यू कंपनीत येणारे-जाणारे कर्मचारी थांबले आहेत. त्यामुळे अलिबाग, पेणकरांवरची टांगती तलवार आता बाजूला झाली आहे. जनतेच्या एकजुटीचा हा विजय आहे.)