कमळ पतसंस्थेकडून वादळग्रस्तांसाठी ‘कर्ज योजना’ जाहीर

0
435
उपलब्ध करुन देणार 50 हजार रुपयांचे कर्ज

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालेले रायगडकरांसाठी कमळ नागरी सहकारी पतसंस्थेने ‘निसर्ग चक्रीवादळ कर्ज योजना’ जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत चक्रीवादळग्रस्तांना 50 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ‘कमळ पतसंस्थे’मार्फत करण्यात आले आहे.

निसर्ग चक्रीवादळाने रायगडला झोडपल्यानंतर सर्वत्र भयावह परिस्थिती उद्भवली आहे. या वादळात रायगडातील लाखो लोकांची घरे, बागायती उद्ध्वस्त झाल्या. डोळ्यात पाणी आणून; पण उमेद खचून न जाता प्रत्येकजण या परिस्थितीतून आपला उद्ध्वस्त संसार सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. समाजाचेच एक अंग असलेल्या अलिबागच्या कमळ नागरी सहकारी पतसंस्थेने या चक्रीवादळग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

जिल्ह्यात कमळ पतसंस्थेच्या 13 शाखा कार्यरत असून, प्रत्येक शाखेचा लोकसंपर्कही चांगला आहे. त्या-त्या ठिकाणच्या शाखाधिकार्‍यांनी वादळ झाल्यानंतर दुसर्‍याच दिवसापासून आपल्या भागात झालेल्या नुकसानीचा आढावा घेेतला. आपल्या परिसरातील लोकांना आपण कशाप्रकारे मदत करु शकतो, याचा अहवाल अलिबाग येथील मुख्य कार्यालयास दिला. त्याला अनुसरुन आपल्या नियमित कर्ज योजनांबरोबरच चक्रीवादळाने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या बाधित नागरिकांसाठी एक अतिरिक्त कर्ज योजना कमळ पतसंस्थेने सादर केली आहे.

‘निसर्ग चक्रीवादळ कर्ज योजना’ असे या कर्ज योजनेचे नाव असून याद्वारे कमाल 50 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. याचा व्याजदर 10 टक्के असून 36 महिन्यांच्या कार्यकाळात त्याची परतफेड अपेक्षित आहे. कर्जदाराला स्थिरस्थावर होण्याच्या दृष्टीने तीन महिन्यांचा विश्रांती काळ दिला जाणार आहे. चक्रीवादळाने बाधित परिसरातील कमळच्या सर्व शाखांमधून उपरोक्त कर्ज योजना कार्यान्वित केली जाणार असून या योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा असे आवाहन कमळ पतसंस्थेतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here