राज्यात लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवला

0
3468
‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला १ जुलैपासून सुरुवात

मुंबई : राज्य सरकारने लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून ‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यामुळे ३० जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार असून आणखी एक महिना राज्यातील जनतेला टाळेबंदीत रहावे लागणार आहे.

राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यात १ जूनपासून केंद्राची नवी नियमावली आल्यानंतर राज्यात ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू करण्यात आले. त्यात कंटेनमेंट झोन वगळता अन्य भागांत बऱ्याच प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात आले. मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा ३० जून रोजी संपत आहे. त्यामुळे सरकारने राज्यात ३१ जुलैपर्यंत मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा जाहीर केला आहे.

त्यात आधीपासून लागू असलेले बहुतेक नियम कायम राहणार आहेत. राज्यात लॉकडाऊनदरम्यान जिल्हाबंदी आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास मनाई आहे. ही बंदी यापुढेही कायम राहणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील सर्व भागात ये-जा करण्याची मुभा आहे ती मात्र कायम राहणार आहे. एसटीची मर्यादित सेवा राज्यात सुरू झाली आहे. ती यापुढेही तशीच राहणार आहे.

यात महत्वाची बाब म्हणजे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त योग्य ती पावले उचलत स्थानिक परिसरात निर्बंध लागू करु शकतात असे राज्य सरकारने सांगितले आहे. कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टींना परवानगी नाकारण्याची तसेच लोकांच्या हालचालींवर ते प्रतिबंध आणण्याची परवानही त्यांना देण्यात आली आहे.

केवळ आर्थिक चक्र सुरु करण्यासाठी महाराष्ट्रात मिशन बिगिन अगेन सुरु केल असले तरी कोरोनाचे संकट टळलेले नाही, त्यामुळे गर्दी करू नका, आवश्यक कामासाठीच बाहेर जा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्याला संबोधित करताना केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here