महाड ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकेची कोरोनावर मात

0
231

महाड : कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोव्हीड-19 विषाणू संसर्ग बाधित झालेल्या महाड ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकेने कोरोनावर मात केली आहे. आज (24 मे) या परिचारिकेला रुग्णालयातून सोडण्यात आले.

महाड ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी वर्गाने आणि महाड प्रेस असोसिएशनच्या सदस्यांनी फुलांची उधळण करत या परिचारिकेला रुग्णालयातून निरोप दिला. तिच्यावर उपचार करणारे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप आणि त्यांच्या टीमचे यावेळी सर्वांनी अभिनंदन केले.

या परिचारिकेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर तिच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्येच उपचार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. डॉक्टरांची मेहनत आणि या परिचारिकेच्या हिमतीमुळे ती ठणठणीत बरी झाली आहे.

रुग्णालयातून बाहेर पडताना तिचे स्वागत करण्यासाठी महाडच्या नगराध्यक्ष स्नेहल जगताप, तहसीलदार चंद्रसेन पवार, डॉ. भास्कर जगताप, डॉ. बिरादार, महाड प्रेस असोसिएशनचे सदस्य, काँग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महाड ग्रामीण रुग्णालयातही या परिचारिकेचे सहकार्‍यांकडून जंगी स्वागत करण्यात आले.