मुरुड : वादळी पावसामुळे आंबे गळून पडले; बागायतदारांचे नुकसान

0
123

सुधीर नाझरे/मुरुड जंजिरा । कोरोनाचे संकट गहिरे होत चालले असताना, नैसर्गिक संकटाने शेतकर्‍यांचे पार कंबरडे मोडून टाकले आहे. बुधवारी (29 एप्रिल) झालेल्या वादळी पावसामुळे तयार आंबे गळून पडल्याने मुरुडमधील बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
राज्यावर सध्या कोरोनाचे संकट घोंघावते आहे. त्यात बुधवारी महाड, पोलादपूर, कर्जत, खालापूर तालुक्यासह मुरुडमध्ये वादळी पावसाने हजेरी लावून मोठे नुकसान केले आहे. रात्री आठ वाजता मुरुड तालुक्यातील काही भागात विजेचा कडकडाट व वादळी वार्‍यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाने अनेकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
काही ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर नारळाची झाडे पडून तर काही ठिकाणी भिंत पडून नुकसान झाले आहे. आंबा, काजू बागांचेही या अवकाळी पावसाने नुकसान केले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने आंबा बागायतदार, शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.
अवकाळी पावसासह वादळाचा तडाखा बसला. तर काही भागात बारीक गारा पडल्याची माहिती मिळत आहे. तासभर सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाने मुुुुरुड शहरातील जुनी पेठ येथील गायकवाड यांच्या घरासमोरील संरक्षण भिंत तर समुद्र किनारी नाराळाची अनेक झाडे वीज वाहनीवर पडून तर अनेकांची घरावरील पत्रे पडून नुकसान झाले आहे.
खारअंबोली गावातील माजी सरपंच तथा शेतकरी-मनोज कमाने यांच्या संपूर्ण आंबा बागेचे नुकसान झाल्याने, ते आर्थिक संकटात सापडले आहेत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन, तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे.

समुद्रकिनारी नारळाची झाडे विजेच्या तारांवर तसेच ट्रान्सफॉर्मरवर पडून वीज पुरवठा खंडित झाला आहे. छाया : सुधीर नाझरे

रात्रीपासून वीज पुरवठा खंडित

मुरुड शहरात बुधवारी (29 एप्रिल) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटून वादळी पाऊस झाला. समुद्रकिनारी नारळाची झाडे विजेच्या तारांवर तसेच ट्रान्सफॉर्मरवर पडून वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे मुरुडमध्ये रात्रीपासून वीज नसून, मुरुडकर उकाड्याने हैराण झाले आहेत.