खाजगी रुग्णालयाने घेतले नाही…सरकारी रुग्णालयात जागा नव्हती…

0
5124
File Photo
रोहे येथील रुग्णाचा अखेर मृत्यू

अलिबाग । कोविडचा संशयित रुग्ण…श्‍वसनाचा त्रास होऊ लागला म्हणून रोहे येथील खाजगी रुग्णालयात नेले. तिथे त्याला घेतले नाही. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. जिल्हा रुग्णालयाने पनवेलला नेण्यास सांगितले. कामोठे येथे बेड उपलब्ध नव्हते. शेवटी माजी आमदाराच्या फोनवरुन पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाला दाखल करुन घेण्यात आले…मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता…

रोहा महादेवखार येथे राहणार्‍या एका गृहस्थाला ताप येत-जात होता. त्यामुळे त्याची कोविड टेस्ट करण्यात आली. रिपोर्ट येण्याआधीच रविवारी (28 जून) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याला श्‍वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी रोहे येथील एका खाजगी रुग्णालयात नेले. मात्र खाजगी रुग्णालयाने या रुग्णाला दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यामुळे या रुग्णाला रोहा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथेदेखील अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने ती येईपर्यंत ऑक्सिजन लावून ठेवण्यात आले.

सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास 108 रुग्णवाहिकेचा चालक आणि एक डॉक्टर रुग्णालयात आले. मात्र या रुग्णवाहिकेचा रिव्हर्स गिअर पडत नसल्याचे चालकाने सांगितले. त्यामुळे रुग्णाचा मुलगा, सुरक्षारक्षक आणि काही ग्रामस्थांनी धक्का मारुन ती सुरु केली. अलिबाग जिल्हा रुग्णालयात या रुग्णावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी कामोठे येथील रुग्णालयात नेण्यास सांगितले. इथे पुन्हा रुग्णवाहिकेसाठी फोनाफोनी केल्यानंतर अखेर या रुग्णाला कामोठेला नेण्यात आले. या रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

आता करायचे काय? नातेवाईकांसमोर बाका प्रसंग होता. परंतू या सर्व प्रसंगात अलिबागचे माजी आमदार पंडीत पाटील हे संपर्क साधून होते. त्यांनीच पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्याशी संपर्क साधून या रुग्णाला मदत करण्यास सांगितले. यानंतर म्हात्रे यांनी प्रयत्नांती पनवेल उपजिल्हा रुग्णालयात या रुग्णाला दाखल करुन घेतले. आयसीयूत उपचार सुरु होईपर्यंत दुपारचे सव्वातीन वाजले होते.

पहाटे साडेतीन ते दुपारपर्यंत सुमारे 12 तासांचा काळ केवळ एका रुग्णाला उपचार मिळण्यासाठी गेला होता. उपचार मिळायला खूप उशिर झाला होता. शेवटी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाचा कोविड टेस्ट रिपोर्ट अजून यायचा बाकी आहे. कदाचित तो निगेटीव्ह असेल किंवा पॉझिटीव्ह…पण एका रुणाचा मृत्यू हा सरकारी अनास्थेमुळे झाला असल्याचे सध्या तरी दिसते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here