महाड ग्रामीण रुग्णालयातील परिचारीकेला कोरोनाची लागण

0
128

* कोकरे येथील पॉझिटीव्ह रुग्णाच्या आली होती संपर्कात *

महाड : महाड ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारीकेला कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी (13 मे) या परिचारीकेचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. महाड ग्रामीण रुग्णालयातच तिच्यावर उपचार सुरु करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली.

4 मे रोजी तालुक्यातील कोकरे येथील एक रुग्ण पॅरालिसीसच्या उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात आला होता. त्याची तपासणी करण्याच्या निमित्ताने ही नर्स त्याच्या संपर्कात आली होती. हा रुग्ण नंतर माणगांव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेला आणि तेथून पाठविण्यात आलेला त्याचा कोरोना तपासणीचा स्वॅब पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या या परिचारीकेचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.

बुधवारी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर या परिचारीकेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर तातडीने या परिचारीकेला महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले असून डॉ. जगताप यांनी तिच्यावर उपचार सुरू केले आहेत. दरम्यान, 4 मे पासून या परिचारीकेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.