चक्रीवादळ : मुरुडमधील १९७ नुकसानग्रस्त मच्छिमारांना केवळ 6 लाखांची मदत!

0
655
file photo
बोटी दुरुस्त करायच्या कशा? संतप्त कोळी समाजबांधवांचा सवाल

सुधीर नाझरे/मुरुड-जंजिरा : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या मुरुड तालुक्यातील मच्छिमारांच्या पदरी नुकसान भरपाईच्या नावे निराशा पडली आली आहे. शासनाकडून बोट आणि जाळ्यांच्या भरपाईसाठी केवळ 6 लाख 11 हजार रुपये मदत मिळाली आहे. या तुटपुंज्या मदतीमुळे येथील कोळीसमाजातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, या अल्प मदतीत करायचे काय? असा प्रश्‍न त्यांना पडला आहे.

मुरुड तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे शेकडो बोटींचे नुकसान झाले आहे. वादळ ज्यावेळी झाले. त्यावेळी ताशी 120 किलोमीटरच्या वेगाने जोरदार वारे वाहिल्यामुळे अगरदांडा, राजपुरी, कोर्लई, बोर्ली, नांदगाव, एकदरा व मुरुड बंदरात उभ्या असलेल्या होड्या एकमेकांवर आदळून फुटल्या व प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. 197 मच्छिमारांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आणि होड्या, जाळ्यांच्या भरपाईपोटी तालुक्याला 6 लाख 11 हजार रुपयांची मदत प्राप्त झाली.

आमदार, खासदार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या नुकसानीची पाहणी केली. तसेच मच्छिमारांना मोठे अर्थसहाय्य मिळेल, असे आश्वासन दिले होते; परंतु प्रत्यक्षात मुरुड तालुक्यासाठी केवळ 6 लाख 11 हजार इतकी तुटपुंजी मदत बोटींच्या नुकसानीपोटी तहसील कार्यालयात प्राप्त झाली आहे. या पैशांत काय होणार? असा प्रश्‍न कोळी समाजबांधवांना पडला असून, तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

चक्रीवादळात मच्छिमार बोटींचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र मिळालेली मदत ही अपुरी आहे. यामुळे कोळी समाजातील होडी मालकांना कमी पैसे प्राप्त होणार असून कोळी समाज नाराज असल्याचे रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी सांगितले. मनोहर बैले यांच्यासह सागर कन्या मच्छिमार सोसायटीचे उपाध्यक्ष मनोहर मकू, संचालक अजित भोबू, भालचंद्र गारडी, रोहिदास मकू, बाबुराव कुला बकर व विठ्ठल सवाई यांनी शासनाने दिलेल्या या तुटपुंज्या मदतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

मनोहर बैले यांनी सांगितले की, एका बोटीचे कमीत कमी 25 हजारपेक्षा जास्त नुकसान झाले आहे; मग जर कमी पैसे आले असतील तर बोट मालकाला त्याचा उपयोग काय? खूपच अल्प पैसे मिळणार आहेत. दुरुस्तीचा अधिकचा खर्च आवश्यक आहे. 1 ऑगस्ट रोजी कायदेशीर मच्छिमारी सुरु झाल्यावर मच्छिमार बोट समुद्रात कशी न्यायची? असा मोठा प्रश्न मच्छिमारांसमोर उभा राहिला आहे.

एकतर मच्छिमार आधीच अवकाळी पाऊस, फयान वादळ, निसर्ग चक्रीवादळ व कोरोनाच्या संचारबंदीमुळे मासळी मार्केट बंद अशा या विविध संकटांचा सामना करुन करुन समस्त कोळी समाज थकला आहे. त्यात तुटपुंजी मदत ही औषधाला न पुरणारी असल्याचे मत बैले यांनी व्यक्त केले आहे. तसेच शासनाने बोट दुरुस्तीसाठी मोठे आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणीही कोळी समाजाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, एकदा अनुदान दिल्यावर पुन्हा नव्याने रक्कम येईल का? याबाबतही कोळी समाजाने शंका उपस्थित केली आहे.

197 मच्छिमारांच्या बोटींचे आणि जाळ्यांचे नुकसान झाले होते. सुरुवातीला जुन्या निकषांनुसार पंचनामे होऊन आलेली 6 लाख 11 हजार रुपयांची नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली आहे. आता नवीन शासन निर्णयाप्रमाणे वाढीव भरपाई मिळण्याकरिता शासनाकडे मागणी केली आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर नुकसानग्रस्त मच्छिमारांना त्याचे वितरण करण्यात येईल.
– गमन गावित, तहसीलदार, मुरुड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here