जिल्ह्यात शिमगोत्सव उत्साहात

0
574

अलिबाग । रायगडात ठिकठिकाणी होळीचा सण परंपरागत पद्धतीने साजरा करण्यात आला. सोमवारी (दि.9) होलिकामातेचे पूजन करुन, तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून, यथासांग पूजा करण्यात आली आणि रात्री होळीदहन करण्यात आले. तर मंगळवारी उत्साहाचे रंग उधळत धुळवड साजरी करण्यात आली.

जिल्हाभरात सोमवारी सार्वजनिक आणि खाजगी अशा 4 हजार 3 होळ्या लावण्यात आल्या. तर 78 ठिकाणी पालखी मिरवणुका काढण्यात आल्या. काही ठिकाणी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दुसर्‍या दिवशी मंगळवारी धुळवडीचे रंग उधळण्यात आले. कमीत कमी पाण्याच्या वापर करुन विविध सुक्या रंगाचा वापर करुन धुळवड साजरी करण्यात आली. बच्चेकंपनीसह तरुण, ज्येष्ठ मंडळीही रंगात न्हाऊन निघाली होती. समुद्र किनारे सायंकाळपर्यंत गजबजलेले दिसून आले.
ग्रामीण भागात पारंपारिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली. दुपारनंतर ग्रामीण भागात पोस्तची धूमही पहायला मिळाली. सोंगे काढून, घरोघरी फेरी मारण्यात आली. मात्र धुळवडीचा सण मंगळवारी आल्याने अनेकांचा हिरमोड झाला, त्यामुळे आज बुधवारी (दि.11) मटणावर ताव मारत तिखट सण साजरा करण्यात येणार आहे.