कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सहा जणांची टेस्ट नेगेटीव्ह

0
77

तळा तालुक्यातील नागरिकांना दिलासा देणारी बातमी…

किशोर पितळे/संजय रिकामे/तळा । तळा तालुक्यात आढळून आलेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील 6 व्यक्तीचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्वांचे रिपोर्ट आज (14 मे) नेगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे तळावासियांना दिलासा मिळाला आहे.

लॉकडाऊनदरम्यान, मुंबई येथील धारावी परिसरातून तळेगाव येथे आलेल्या एका 20 वर्षीय तरुणाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. त्यामुळे तळेगावमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या चालकासह सहा जणांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आले होते. माणगांव उपजिल्हा रुग्णालयामधून या सर्वांचे स्वॅब कोरोनाच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून सर्वांचे नमुने कोरोना नेगेटीव्ह आले असल्याची माहिती तळा तहसील कार्यालयातून मिळाली आहे. या दिलासादायक बातमीमुळे तळेवासियांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

दरम्यान, मुंबई उपनगरातून विशेष करुन नालासोपारा, विरार, बोरिवली येथून अनेक चाकरमानी तालुक्यात दाखल होत आहेत. मुंबईकरांना गाव पातळीवर दक्षता कमिटी, ग्रामस्थ चांगल्याप्रकारे सहकार्य करत असताना आलेल्या मुंबईकरांनी सतर्क राहुन सॅनिटायझर, मास्कचा वापर करावा, 28 दिवस शहरात, गावात फिरु नये, सोशल डिस्टन्स राखणे गरजेचे आहे. आपल्याबरोबर आपल्या कुटुंबातील माणसांची काळजी घ्यावी आणि प्रशासनाकडून कोणतीही माहिती लपवून ठेऊ नये, प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.