कोकणातील चाकरमान्यांना मूळ गावी पोहचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील – खा. सुनील तटकरे

0
678
धम्मशील सावंत/पाली-बेणसे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाच्या धर्तीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना व खबरदारी घेण्याचे आवाहन रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून नागरिकांना केले. कोकणातील चाकरमान्यांना मूळ गावी पोहचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.

कोरोनासारख्या भयावह संकटाचा बिमोड करण्यात काही देश यशस्वी झाले आहेत. त्यामुळे आपणही आत्मविश्वासाने व संयमाने याचा सामना करत या भयावह परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडू, असा विश्वास त्यांनी नेटकऱ्यांना दिला. मुंबईत अडकलेल्या कोकणातील चाकरमान्यांचा प्रश्न मोठा आहे. त्यांना खा. तटकरे यांनी योग्य व दिलासादायक मार्गदर्शन केले. सगळ्यांना आपल्या मूळ गावी त्यांच्या घरी पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण हे काम टप्प्याटप्प्याने होईल, असा विश्वास त्यांनी दिला. जिल्ह्यात एक लाखाहून अधिक नागरिक परतले असून त्यांना क्वारंटाईन करून आपापल्या गावी पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
शेतकरी, आंबा, काजू, सुपारी उत्पादक तसेच मच्छिमारांना जास्तीतजास्त आर्थिक मदत मिळण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत, त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. लहान-लहान व्यापारी, उद्योजकांचेही प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचे त्यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील ॲारेंज झोन असल्याने काही दुकाने, व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र हे करताना सुरक्षिततेचे सगळे नियम काटेकोरपणे पाळले जायलाच हवेत, अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच अनेक तालुक्यांमध्ये, शहरांमध्ये ३-४ दिवसांचा स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात येत आहे, हे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य पाऊल असल्याचे ते म्हणाले.
बॅंकाच्या कर्जाच्या हफ्त्यांबद्दल तक्रार आली असता खा. तटकरे यांनी संपूर्ण माहिती पाठवण्याच्या सूचना केल्या. रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशाबाहेर जर एखादी बॅंक काम करत असेल तर त्यांवर नक्कीच कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी दिले. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच महामार्गाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असल्याचेही खा. तटकरे यांनी नमूद केले. आज या महामार्गाचे काम जलद गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.