गावकरी स्वागताला तयार आहेत; मुंबईकरांनो तुम्हीही जरा मन मोठे करा!

0
310

| राजन वेलकर |

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेला लॉकडाऊन… शहरांमध्ये अडकून पडलेला कोकणवासी….गावी परतण्याची ओढ…चालत गाव गाठणारे मुंबईकर… या सर्वांचा परिपाक म्हणजे, मुंबईकर चाकरमानी आणि गावाकडील ग्रामस्थ यांच्यात सुरु असलेला वाद. या वादाला पुढे करुन हात वर करणारे लोकप्रतिनिधी… कोरोनाच्या अवास्तव भितीमुळे हे सर्व घडत असल्याचे जेव्हा माझ्या लक्षात आले, तेव्हा एक आराखडा रायगड आणि रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी यांना मी दिला. रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्‍यांनी त्यात रुची दाखवली. By Rajan Velkar

माझे सरळ आणि साधे म्हणणे होते. कुठल्याही मुंबईकराला त्याच्या गावात जाण्यापासून कोणालाही अडवता येणार नाही. कामधंद्यानिमित्ताने हे कोकणवासी मोठ्या शहरांत गेले असले तरी त्यांचा जीव कायमच गावाकडे राहिला आहे. त्यामुळे मुंबईकर आणि ग्रामस्थांनी वाद न करता सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. कोरोनामुळे देश बंद आहे. त्याच देशातील ग्रामीण जनतेने कोरोनाला घाबरुन गाव बंद केले तर आश्चर्य वाटायला नको. त्यांची भीती रास्त आहे. कारण त्यांच्या कानावर पडणार्‍या अर्धसत्य बातम्या हा त्यांच्या माहितीचा मुख्य सोर्स आहे. त्यामुळे मुंबईकरांकडे संशयाने पाहिले जाते. त्यांचे रस्ते अडवले जातात. खरे तर मुंबईकरांचे नाही तर कोरोनाचे रस्ते अडविण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न आहे हे मुंबईकरांनी एकदा लक्षात घेतले पाहिजे. कोरोना हा परदेशातून मोठ्या शहरात आणि आता मोठ्या शहरातून गावात येऊ नये, असे वाटणे गैर नाही. याआधी कोणी अडवलेय का गावात येण्याचे रस्ते? त्यामुळे मुंबईकरांनी गावकर्‍यांवर ‘व्हीलन’ न ठरवता त्यांची भावना समजून घेतली पाहिजे.

लॉकडाऊनमध्ये अडलेल्या कोकणवासियांना त्यांच्या गावी सोडा, अशी भूमिका जेव्हा मी मांडू लागलो, तेव्हा लोकप्रतिनिधी आणि काही पत्रकार याला विरोध करायला लागले. त्यांचे दोन मुद्दे होते. पहिला मुंबईकर गावामध्ये आले तर गावांची वाट लागेल. दुसरा म्हणजे गावाकडची माणसं मुंबईकरांना गावी आणू नका, असा दबाव टाकत आहेत. दोन्ही मुद्दे रास्त आणि खरे होते. परंतु मी अस्वस्थ होतो. मुंबईकर गावालाही आला पाहिजे आणि गावांपासून कोरोनाही लांब राहिला पाहिजे, यावर मी विचार सुरु केला. याचदरम्यान रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी, त्यांच्या जिल्ह्यातील काम करण्याची संधी आणि माझा उत्साह वाढला. त्यांना मी मंडणगड या अतिदुर्गम तालुक्यात काम करण्याची परवानगी मागितली. By Rajan Velkar

मंडणगडचे तहसीलदार वेंगुर्लेकर यांना सांगून काम सुरु केले.देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर सानप, बाणकोट विभागाचे पोलीस निरीक्षक, उपनिरिक्षक तसेच माझा बालपणीचा मित्र ग्रामसेवक दिपक टेमकर यांचे चांगले सहकार्य मिळाले. यादरम्यान मंडणगडच्या आरोग्य सेवकाच्या अगाऊपणाचे किस्सेही ऐकायला मिळाले. ज्या गावात मी जाणार होतो तिथला गावित नावाचा ग्रामसेवक अक्षरशः परागंदा झाला. गटविकास अधिकार्‍यांनी सांगितल्यानंतरही हे महाशय शेवटपर्यंत भेटले नाहीत. शेवटी व्यक्तीगत पातळीवर काम सुरु केले. देव्हारे पंचक्रोशीतील धामणी, वेरळा, उमरोली, गुडेघर आणि पन्हळी या चार गावांतील प्रमुखांना माझी संकल्पना समजविण्याचा प्रयत्न केला.

मुंबईकर मंडळी सध्या अत्यंत वाईट अनुभवातून जात आहेत. त्यांना आपण आधार दिला पाहिजे. जे गावी येण्यास इच्छुक आहेत त्यांची काळजी आपण का घेतली पाहिजे? हे सविस्तर समजावून सांगितल्यानंतर, मुंबईकरांना घेऊन चिंतेत असणारे गावकरी त्यांच्या स्वागताला तयार झाले. विश्वास ठेवा, दुसऱ्याच दिवशी पुरुष आणि महिला दोघांनीही झपाटल्यागत काम सुरू केले. मुंबईकरांच्या अपेक्षित संख्येनुसार तात्पुरत्या स्वरुपाच्या खोल्या बनवायला घेतल्या आणि संध्याकाळपर्यंत किमान 60 ते 100 लोकांना क्वारंटाईन करता येईल, इतक्या खोल्या बनवून तयारदेखील झाल्या. त्यांच्यासाठी तात्पुरते स्वच्छतागृह, प्रसाधनगृह उभारण्यात आले. वीज, पाणी उपलब्ध करुन देण्यात आले. चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या कष्टाने हे गावकर्‍यांनी उभारले आहे. काही कमी जास्त असेलही; परंतू तालुक्याच्या ठिकाणी, अनोळखी जागी क्वारंटाईन होण्यापेक्षा गावाजवळ, गावाच्या कुशीला कधीही सुरक्षित आहे.

होम क्वारंटाईन आणि गावकरी वाद टाळण्यासाठी…

गेल्या दोन चार दिवसांत रेड झोनमधून खाजगी वाहने घेऊन गावाकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. तालुक्याच्या ठिकाणी क्वारंटाईन करण्यासाठी तेथील अधिकारी तयार नाहीत. मेडीकल केलंय का? एवढे विचारुन त्यांना गावात क्वारंटाईन होण्यास सांगण्यात येत आहे. ‘रेड झोन’मधून अचानक माणूस गावात येऊन पोहोचतो तेव्हा गावकरी बिथरतात. यातून खटके उडतात. हाणामारीपर्यंत प्रकरणे जातात. येत्या काळात पोलिसांना अशाप्रकारच्या तक्रारी निस्तरण्यासाठी स्वतंत्र माणूस नेमावा लागेल, अशी परिस्थिती आहे. गावात येणार्‍या भूमिपुत्राला त्याच्या घरात जाण्याचा संविधानिक अधिकार आहे. त्याला कोणीही रोखू शकत नाही. मात्र गावाच्या भल्यासाठी, पुढचा अनर्थ टाळण्यासाठी मुंबईकरांनीही मोठे मन करुन गावकर्‍यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. By Rajan Velkar

फक्त 14 दिवसांचा प्रश्न आहे. ‘गाव सुरक्षित राहिले तर आपण सगळे सुरक्षित राहू’ ही भावना सर्वांची असली पाहिजे. अन्यथा एका छोट्याशी चुकीमुळेे संपूर्ण गावाची स्वॅब स्टेस्ट करायची वेळ येते. गावच्या गाव सील करण्यात येते. सोबत कोरोनाचे भयदेखील वाढते. गावाकडे महानम्हातारी माणसे जास्त आहेत. त्यांच्यासाठी गावाने केलेल्या व्यवस्थेत क्वारंटाईन होणे आवश्यक आहे.गावकर्‍यांनी मन मोठे केले आहे आणि तुम्हीदेखील त्यांच्या भावनांचा आदर करा, ही विनंती.