पोलादपूर तालुक्यात तीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले

0
185
  • कापडे निवाचीवाडी येथे दोन तर एक उमरठ फौजदारवाडी येथील

शैलेश पालकर/पोलादपूर : पोलादपूर तालुक्यात कापडे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील निवाची वाडी येथे दोन आणि उमरठ फौजदारवाडी येथील एक असे तीनजण कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाबराव सोनावणे यांनी दिली.

1 मे 2020 पासून पोलादपूर तालुक्यात सुमारे पाच हजारांहून अधिक चाकरमानी व त्यांच्या कुटुंबियांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. 15 मे नंतर पोलादपूर तालुक्यात आलेले कापडे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील निवाची वाडी येथील दोघेजण गेल्या तीन दिवसांपासून माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे खोकला सर्दी आजारामुळे उपचारासाठी पाठविण्यात आले होते. त्यांची कोविड 19 टेस्ट करण्यासाठी स्वॅब घेऊन एमजीएम येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचप्रमाणे उमरठ ग्रामपंचायत हद्दीतील फौजदार वाडी येथे गेल्या 10 दिवसांपूर्वी आलेल्या एका व्यक्तीला श्वास घेण्यास अडथळा होत असल्याने त्यालाही माणगाव येथे पाठविण्यात आले होते.

आज या तिघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांची यादी बनवली आहे. कापडे बुद्रुक निवाचीवाडी येथे सील करुन प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्याचे प्रस्ताव रायगड जिल्हाधिकारी कार्यालयास महाड उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्यामार्फत पाठविण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, शनिवारी कोविड 19 पॉझिटीव्ह आलेल्या तीनही रुग्णांवर महाड येथील कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात येतील, अशी माहिती तालुका अधिकारी डॉ. गुलाबराव सोनावणे यांनी दिली.