रायगडात मुसळधार पावसाचा इशारा…पुढचे दोन दिवस पावसाचे…

0
1967

अलिबाग : उत्तर कोकणाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिह्याच्या काही भागात आज (२९ जून) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रायगडसाठी पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचे असणार आहेत. तसा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्राने दिला आहे.

जून महिना संपत आला तरी गायब असलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली होती. पाऊस नसल्याने शेतातील भात रोपे पिवळी पडत चालली होती. चिंतेचे ढग गडद होत चालले असताना आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रायगडात पावसाने सुरुवात केली आहे. जोरदार पाऊस पडत असून पुढचे दोन दिवस जिल्ह्याच्या विविध भागात तो बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

आज दुपारी मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्राने दिलेल्या इशाऱ्यानुसार, उत्तर कोकणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

रायगडात आज सुरू झालेला हा पाऊस पुढचे दोन दिवस राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. ३० जून आणि 1 जुलैलाही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी वादळी वारेही वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, अलिबागमध्ये रात्री ९ वाजल्यापासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here