अपंगत्वाला झिडकारून कोरोनाशी दोन हात

0
108
  • पायाने अधू असतानाही मास्क शिवून गरिबांना वाटप
पनवेल : कोरोना या महामारी रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून शासकीय पातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर काहीच सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे. खारघर येथील अशाच एका सामाजिक भान असलेल्या व्यक्तीने आपल्या अपंगत्वाला झिडकारून कोरोना विरोधात एकप्रकारे लढा पुकारला आहे. पायाने अधू असलेला हा कोविड योद्धा मास्क शिवून गोरगरिबांना मोफत वाटप करीत आहे. तसेच पोलिसांनाही पाणी देऊन त्यांची तहान भागवत आहे.

अनेक जण विविध पद्धतीने प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या कोरोना संसर्गजन्य आजाराच्या या युद्धात आपले योगदान देताना दिसून येत आहेत. त्यापैकी खारघरमध्ये सेक्टर 20 येथे राहत असलेले सय्यद अब्दुल सुभान हे एक होय. पायाने विकलांग असलेले सय्यद यांचे सलून आहे. त्यावरच ते आपला उदरनिर्वाह करतात. परंतु लॉक डाऊन असल्याने गेल्या काही दिवसांपासून सलून  बंद आहे. त्यांना केस कर्तनाबरोबरच शिवणकला ही अवगत आहे. त्याचा सदुपयोग करत सय्यद अब्दुल सुभान यांनी स्वखर्चाने स्वतः मास्क शिवले व ते खारघर शहरातील गोर गरिबांना, निःशुल्क वाटप करीत आहेत.
तसेच पोलिसांना पाण्याचे वाटप करतात.
सय्यदभाई नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात मग ते रक्तदान शिबीर असो किंवा इतर लोकहिताचे उपक्रम असोत. अशा कोविड योद्धयाला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमचा सलाम आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी व्यक्त केली.