विद्यापीठाच्या परीक्षा जुलैपर्यंत लांबणीवर? शैक्षणिक वर्षावरही होणार परिणाम

0
185

मुंबई । जयेश सावंत : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विद्यापीठांच्या परीक्षा आणि शैक्षणिक वर्षांच्या वेळापत्रकाचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार १६ ते ३१ जुलै २०२० दरम्यान परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टाळेबंदीमुळे देशभरात विद्यापीठाच्या परीक्षा समोर ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, करोनाचे संकट वाढतच असल्याने शेवटी परीक्षा आणि शैक्षणिक वर्षांसंदर्भात यूजीसीच्या अंतर्गत समिती गठित करून देशपातळीवर एकच निर्णय घेण्यात आला आहे. या समितीच्या आदेशानुसार १५ मेपर्यंत ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात यावे. यानंतर १६ मे ते ३१ मे या कालावधीत प्रोजेक्ट वर्क आणि अंतर्गत गुणांची पडताळणी करावी. यानंतर संपूर्ण जुन महिना सुट्टी देऊन विदयार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ द्यावा आणि मग १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत टर्मिनल सेमिस्टर परीक्षांचे आयोजन करून ३१ जुलैपर्यंत त्याचा निकाल जाहीर करावा. तर १६ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत इंटरमिजिएट सेमिस्टर परीक्षांचे आयोजन करून त्याचा निकाल १४ ऑगस्ट पर्यंत जाहीर करण्याची शिफारस या समितीने केली.

इतकंच नव्हे तर यापुढील इतर सर्व इयत्तांचे शैक्षणिक वर्ष १ ऑगस्टपासून सुरु होईल तर प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश १ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत पूर्ण करून त्यांचेही वर्ग १ सप्टेंबरपासून सुरु करावे आणि या सेमिस्टरची परीक्षा १ ते २५ जानेवारी या कालावधीत पार पाडावी. तर अंतिम परीक्षा १ ते ३१ जुलै या कालावधीत पार पाडावी म्हणजे यापुढे सप्टेंबर ते जुलै असे शैक्षणिक वर्ष सुरु राहील अशी शिफारस या समितीने केली आहे. यासोबतच विद्यापीठांनी व्हर्च्युअल क्लासरूमची स्थापना करावी आणि २५ टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन तर ७५ टक्के अभ्यासक्रम ऑफलाईन करावा असे या संतीने नमूद केले आहे.