आ.भरत गोगावलेंच्या मंत्रीपदासाठी , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कसोटी

By Raigad Times    10-Dec-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | राज्यात एकनाथ शिंदे सरकारचा काळ संपून फडणवीस सरकारचा सुरु झाला आहे. ‘महाडचे आमदार भरत गोगावले मंत्री होणार का’? या अंकाचा दुसरा भाग ‘विच्छा माझी पुरी करा’ सुरु झाला आहे. मात्र मंत्रिपदासाठी महायुतीमधील रस्सीखेच पाहता, गोगावलेंची इच्छा एकनाथ शिंदे पुरी करणार का? याची चर्चा रायगडात सुरु आहे.
 
२०१९ मध्ये उध्दव ठाकरे यांनी महाआघाडीसोबत सरकार स्थापन केले. तिसर्‍यांदा आमदार झालेले महाडचे आमदार भरत गोगावले यांचा मंत्रिमंडळात नंबर लागेल, अशी अपेक्षा त्यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांना होती. मात्र पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदार अदिती तटकरे यांना राष्ट्रवादीने मंत्री केले. गोगावले यांना मंत्रीपद नाही तर ठीक; पण किमान रायगडचे पालकमंत्रीपद तरी अदिती तटकरे यांना मिळू नये, यासाठी शिवसेनेचे आमदार प्रयत्नशील होते.
 
मात्र तसे होऊ शकले नाही. मंत्रीपद नाही, वरती पालकमंत्रीपद नवख्या अदिती तटकरे यांना देण्यात आल्याने रायगडातील तिन्ही आमदारांनी बरीच आदळाआपट केली. मात्र पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे कानाडोळा करत राहिले. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड केले. या बंडात महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यासह महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे हे रायगडचे तिन्ही आमदार अग्रक्रमावर होते.
 
गोगावले तर शिंदे यांच्या सावलीप्रमाणे दिसत होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार आले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात पहिल्या पाचमध्ये भरत गोगावले यांचे नाव असल्याच्या चर्चा होती. आ. गोगावले यांनीदेखील अनेकदा तसे बोलून दाखवले. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी शिवून ठेवलेल्या कोटावरुन त्यांची बरीच खिल्ली उडविण्यात आली. मात्र एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देऊ शकले नाही.
 
यानंतर शिंदे यांचे सरकार अडचणीत येऊ नये, यासाठी मंत्रीपदाची संधी सोडली आणि वंचित राहिल्याची भावना गोगावले यांनी बोलून दाखली. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार यांचा गट महायुती सरकारमध्ये सहभागी झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांना संधी मिळाली. यामध्ये श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे यांना थेट कॅबिनेटमंत्री पद देऊ केले. त्यामुळे शिवसेनेचे आमदार पुन्हा एकदा अस्वस्थ झाले.
 
आ. गोगावले यांचे मंत्रीपद त्यांच्यापासून आणखी थोडे दुर गेले. यानंतर त्यांचा अर्धी भाकरीचा किस्सा चांगलाच गाजला. मंत्रीपद मिळत नसेल तरी ठीक, पण रायगडचे पालकमंत्रीपद तरी शिवसेनेकडे राहू द्या, अशी विनवणी करण्याची वेळ शिवसेनेच्या आमदारांवर आली. उदय सामंत यांना पालकमंत्री करण्यात आले; परंतू आ. गोगावले कायमचे अदृश्य मंत्री राहिले. शेवटपर्यंत मंत्रिपदाने त्यांना हुलकावणी दिली.
 
जाहीर कार्यक्रम असो, अथवा पत्रकार परिषदा ते मंत्री होण्याची इच्छा सतत व्यक्त करत राहिले. कधी सगळे प्रयत्न करून दमलो, आता देवालाच कौल लावायचा राहिला आहे म्हणत आपली अगतिकताही व्यक्त केली. माझ्या मंत्रिपदासाठी आता देवाला साकडे घाला असेही गावकर्‍यांना सांगून टाकले; पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार राज्यात सत्तेवर आले आहे.
 
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले आहे. पुन्हा एकदा आमदार गोगावले यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. येत्या १५ डिसेंबरच्या आत राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार ५६ आणि मंत्रीपदे १० ते १२ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रीपदे देताना शिंदे यांनी कसोटी लागणार आहे. अर्थात सरकार पडण्याचे भय नसल्यामुळे काही आमदार आणि माजी मंत्र्यांची नाराजी घेऊन शिंदे, आ. गोगावले यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घालतील का? याची उत्सुकता रायगडकरांना लागली आहे.