लिफ्टचा बहाणा करुन चौकडीने एकाला लुटले; मोटारसायकल घेऊन पसार , कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By Raigad Times    10-Dec-2024
Total Views |
 MUMBAI
 
नवीन पनवेल : चार अनोळखी इसमांनी लिफ्ट मागण्याचा बहाणा करून मोटरसायकल थांबवली आणि मारहाण करून मोटरसायकल, मोबाईल, रोख रक्कम आणि घड्याळ घेऊन ते पळून गेले. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात चार अज्ञात लुटारुंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
केशव सोनवणे हे करंजाडे गाव सेक्टर 4 येथे राहत असून शनिवारी, 7 डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास ते जुई गाव येथे गेले होते. रात्री जेवण करून ८ डिसेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास मोटरसायकलने घरी जाण्यासाठी निघाले. रात्री एकच्या सुमारास करंजाडे गावाकडील बाजूला पार्किंगजवळ खांदेश्वर रेल्वे स्टेशनजवळ ते गेले.
 
मोटरसायकलवरून घरी जात असताना चार अनोळखी इसमांनी त्यांना थांबवले आणि लिफ्ट मागत हॉटेलला सोडण्यास सांगितले. त्यावेळी त्यांना नकार दिल्याने त्यातील दोन इसमांनी त्यांना गाडीवरून खेचले व मारहाण करून हातातील घड्याळ, खिशातील मोबाईल आणि रोख रक्कम 9 हजार रुपये खिशातून काढून घेतली व त्यांना मारहाण करून बाजूला ढकलले.
 
त्यानंतर ते सोनवणे यांच्या मोटरसायकलवर बसून तेथून पळून गेले. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात चार अज्ञात लुटारुंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.