उतेखोल/माणगांव | गेल्या काही वर्षांपासून माणगांव नगरपंचायतीद्वारे शहरातील ओला, सुका कचरा संकलन करुन तो उतेखोल येथील आश्रमशाळेलगत मोकळ्या जागेत डंम्प केला जात आहे. हाच प्लास्टिक व अन्य उपद्रवी घटकयुक्त कचरा भीषणतेने जळतोय की जाळला जातोय? याबाबत सद्यस्थितीत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असा हजारो टन कचरा सतत जळत असल्याने माणगावच्या हवेतील प्रदूषणात वाढ झाली असून, माणगावकरांचा या धुरामुळे कोंडमारा होत होत आहे. त्यातून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, केवळ कोणी तक्रार केल्यानंतरच अग्निशमन सेवेचा वापर करुन पाणी फवारुन आग विझवली जाते.
त्यानंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते.थंडीत हवा जड असल्याने ती वातावरणात उंचावर जात नाही. परिणामी, या काळात विविध माध्यमांतून होणारे घातक वायूंचे उत्सर्जन, सूक्ष्म, अतिसूक्ष्म धूलिकण वातावरणात राहतात. त्यामुळे हिवाळ्यात हवा प्रदूषणात वाढ होते. माणगांव शहरातील जवळपास सर्वच प्रभागांमध्ये गेले काही दिवस एक प्रकारे धुयासारखे दिसणारे धुरके हवेत पसरते आणि ते थेट नागरिकांच्या फुफ्फुसात जाऊन कोंडतो. प्लास्टिक जळल्याचा उग्रवास येऊन अस्वस्थ वाटते, जीव गुदमरतो.
या परिसरातील लहान मुलांसह अनेकांना सर्दी, खोकला, डोळे झोंबणे, मळमळ अशा प्रकारची लक्षणे प्रकर्षाने जाणवत असल्याचे अनेक जणांकडून तसेच आश्रमशाळेतील शालेय विद्यार्थ्यांकडून बोलले जात आहे. खराब हवामानात कधी उष्णता, कधी थंडी, मध्येच पाऊस या बदलाुंळे आजारपण येत असल्याचा समज होऊन, लोक वैद्यकीय औषधोपचार करुन मुकाट्याने हे सहन करतात. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेस नागरिक निद्रावस्थेत असतानाच याचा प्रचंड त्रास जाणवत असल्याने, त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होण्याची दाट शयता व्यक्त होत आहे.
ही बाब सार्वजनिक आरोग्यास जीवघेणी असून, प्रदूषणाच्या टक्केवारीत भर घालणारी आहे. प्लास्टिकच्या विषारी धुरामुळे भविष्यात नागरिकांना फुफ्फुसाच्या गंभीर आजारांना सामोरे जाण्याची वेळ येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. माणगांव नगरपंचायतीद्वारे शहर स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम, उपाययोजनांचा एकीकडे मोठा गाजावाजा होतानाचे चित्र आहे. घंटागाड्या, प्लास्टिक पिशव्या बंदी, गणेशोत्सवात निर्माल्य गोळा करुन कचरा संकलन, सर्वेक्षण केले जाते. जनजागृतीपर मोहिमा राबवत मोठा निधी यावर खर्च होतो.
तर दुसरीकडे माणगांव शहरातील विकास कामे, वसाहती बांधकाम, रस्ते रुंदीकरणात येथे बेसुमार वृक्षतोडीने शहर बकाल झाले असून वायूप्रदूषण भीषण आहे. योग्य सांडपाणी निचरा व्यवस्था नसल्याने नदीचे प्रदूषण वाढले आहे. यातच शहरातील घनकचरा व्यवस्थापनचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी ओला-सुका कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणीचे काम कुर्मगतीने व निष्काळजीपणे दुर्लक्षित झाल्याचेच चित्र आहे.
शासनाकडून प्लास्टिक कचरा क्रशिंगसाठी माणगांव नगरपंचायतीला आलेल्या दोन नवीन मशिन तसेच घंटागाड्या, टँकर, ट्रॅटर भंगार होऊन धुळखात पडले आहेत. असे असताना माणगांवमधील लोकप्रतिनिधी मात्र किरकोळ विकासकामांचा गाजावाजा करत हवा प्रदूषणासारख्या अत्यंत संवेदनशील विषयावर मूळ गिळून बसले आहेत.
शहरातील इनलेट-आऊटलेट विरहित नुसतीच गटार बांधकामे, गणपती विसर्जन घाट, कालव्यावरील घाट बांधुन विकासकामे करण्यात धन्यता मानली जात आहे. ही कामे जास्त महत्त्वपूर्ण नसून प्राथमिकतेने पाणी व हवाप्रदूषण रोखण्याबरोबरचउत्तम आरोग्यसेवा व स्वच्छताविषयक पायाभूत विकासकामांना प्राधान्य देणे महत्त्वाचे आणि दूरगामी जनहितार्थ आहे. एकीकडे सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळण्यास कायद्याने बंदी असताना उघड्यावरच जाळलेल्या प्लास्टिक कचर्यामुळे रहिवासी क्षेत्रातील सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र माणगांव शहरात दिसून येत आहे.