नवीन पनवेल | पनवेल महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून नोकरीला लावून देतो असे सांगून १६ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सुशांत मोहिते, संजय मोहिते आणि गणेश शिंदे (रा. रोहिदास वाडा, पनवेल) यांच्याविरोधात ९ डिसेंबर रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुशांत मोहिते याने त्याचे वडील हे पनवेल महानगरपालिकेत चांगल्या पदावर असून तुम्हाला पनवेल महानगरपालिकेत नोकरीला लावून देतो असे फिर्यादीला सांगितले आणि फिर्यादीसह आणखी एकाची १६ लाख ५० हजारची फसवणूक केली. त्यांना नोकरीलादेखील लावले नाही आणि त्यांनी दिलेली रक्कम परत केली नाही.
याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील सुशांत मोहिते याचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत.