महाडकरांसाठी ६५ कोटींची पाणीपुरवठा योजना , शहरातील अनेक वर्षे जुनी जलवाहिनी बदलणार

By Raigad Times    14-Dec-2024
Total Views |
 mhad
 
महाड | केंद्र शासनाच्या अमृत २.० अभियानांतर्गत महाड शहरासाठीच्या ६५ कोटींची पाणीपुरवठा योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाडचे आमदार भरत गो- गावले यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधी जयंती दिनी भूमीपूजन झालेल्या या योजनेच्या कामाला सुरुवात झाली असून यासाठी लागणारे पाईप, अन्य साहित्य येऊन पडले आहे.
 
कोथुर्डे धरणातून महाड शहरापर्यंत टाकल्या जाणार्‍या १२.८७ किमीच्या जलवाहिनीपैकी दिड किमीची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून नव्याने होत असलेल्या कोथेरी, महाड नपाच्या मालकीच्या कुर्ला धरण व महाड एमआयडीसीकडून होणार्‍या पाणीपुरवठ्याकरीता नवीन पाईप लाईन टाकणे, नवीन साठवण टाक्या बांधणे, शहरातील ४९ किमीची नवीन जलवाहिनी टाकणे आदी कामे पूर्ण होऊन शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्याचे काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यापूर्वी हे काम करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पाणीपुरवठा योजनेचे अभियंता भोईर यांनी दिली.
 
महाड शहरासाठी महत्वपूर्ण ठरणार्‍या आणि गेल्या अनेक वर्षांची असणारी  जुनी जलवाहिनी बदलण्याची मागणी पूर्ण करणारी ६५ कोटींच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा ठेका धुळे येथील श्रमगाथा असोसिएशन या कंपनीला देण्यात आला आहे. महाड शहरातील उत्तर, पश्चिम व काही प्रमाणात पुर्व दिशेकडील भागाला पाणीपुरवठा करणार्‍या कोथुर्डे धरणातून १२.८७ किमीची ५००मीमी व्यासाची डिआयके ७ ची पाईपलाईन टाकली जाणार असून ही पाईपलाईन करंजखोल येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यत टाकली जाईल.
 
यासाठी लागणारे सर्व पाईप साईटवर येऊन पडले असून दीड किमीची पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. कोथुरी व कुर्ला धरणातून ३००, ४०० व ५०० मीमीची पाईपलाईन शिरगांव येथील जंक्शन पर्यत टाकली जाईल त्या जंक्शनपासून किंजलघर येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ५०० मी मी ची डिआयके ७ ची पाईंप लाईन टाकली जाणार आहे.
 
याच बरोबर शेडाव नाका ते महाड शहर आणि नांगलवाडी फाटा ते एमआयडीसी जॅकवेलपर्यंत नवीन ५०० मीमी ची पाईप लाईन टाकली जाणार आहे. महाड शहरातील सर्व प्रभागात उच्च दाबाने मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी दादली पुलाजवळ, भाजीमंडई, सरेकर आळी येथे नवीन उंच टाकी बांधण्यात येणार आहे. या नवीन टाक्यांसह छ. शिवाजी महाराज चौक, नवेनगर व भीमनगर येथील पुर्वीच्या जुन्या टाक्यांमधून शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे.
 
महाड शहरात असलेली अनेक वर्ष जुनी पाईंपलाईन बदलून त्या ठिकाणी साधारण ४९ किमीची ११० ते २५० मीमीची नवीन पाईंप लाईन टाकली जाणार असल्याची माहिती अभियंता भोईर यांनी दिली.