पनवेल | माजी कृषीमंत्री पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांनी गुरुवारी ८५ व्या वर्षांमध्ये पदार्पण केले. त्यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या सूचनेनुसार पनवेल शहर जिल्हा कमिटीच्यावतीने ८४ विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनींचा यथोचित सन्मान करून मोठ्या पवारांना जन्मदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या.
शरद पवार यांना १२ डिसेंबर २०२४ रोजी ८४ वर्ष पूर्ण झाले. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ ते महाराष्ट्र आणि देशाच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात वावरत आहेत. कला क्रीडा साहित्य यामध्ये विशेष अभिरुची असणार्या पवारांनी देशाच्या राजकारणात आपला एक वेगळा ठसा उमटवला. आताचे संरक्षण आणि कृषी मंत्री पद त्यांनी भूषवले. राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनी काम केले. या वयातही न थकता ते अविश्रांत मेहनत करत आहेत.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पनवेल शहर जिल्हाकमिटी कडून सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवकचे प्रदेश सरचिटणीस ड तुषार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शामल मोहन पाटील एज्युकेशन संकुलात गुरुवारी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्ताने ८४ उत्कृष्ट विद्यार्थी, ८४ जेष्ठ नागरिक, ८४ विशेष कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यांना पुढील आयुष्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आपल्या संस्कृतीत वडीलधार्या व्यक्तींना मानाचे स्थान असते तसेच ते स्थान टिकविण्याचे संस्कार आपल्याला पुढील पिढीवर होण्याकरिता जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे सतीश पाटील यांनी सांगितले.